मंडणगड : भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्राप्त जलस्रोतांचे जतन करण्याच्या उद्देशाने मंडणगड महसुल मंडळात ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ मोहिमेंतर्गत लोकसहभागातुन वनराई बंधारे बांधण्याचा कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला. मौजे पाट आणि मौजे भिंगळोली येथे प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून तब्बल १२ वनराई बंधाऱ्यांची यशस्वी उभारणी केली.
या उपक्रमांतर्गत मौजे पाट येथे ७, तर मौजे भिंगळोली येथे ५ असे एकूण १२ वनराई बंधारे बांधण्यात आले. पावसाळ्यानंतर वाहून जाणारे पाणी अडवून भूजल पातळी वाढावी आणि उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या टंचाईवर मात करता यावी, यासाठी हा संयुक्त उपक्रम हाती घेण्यात आला होता.
महसूल विभाग, पंचायत समिती मंडणगड आणि पाट व भिंगळोली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त समन्वयातून ही मोहीम राबविण्यात आली. शासकीय अधिकाऱ्यांसोबतच दोन्ही गावांतील ग्रामस्थ, महिला व युवकांनी प्रत्यक्ष श्रमदानात भाग घेत सामाजिक एकोप्याचे आणि जलसंधारणाचे उत्तम उदाहरण घालून दिले.
मान्यवर व ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग या श्रमदान मोहिमेस लाभला पंचायत समितीच्या सभापती सौ. प्रणाली चिले, मंडळ अधिकारी निलेश गोडघासे, संतोष गायकवाड, गटशिक्षणाधिकारी श्रीमती कल्याणी मुळे, ग्राम महसूल अधिकारी मयूर पंडित, उद्धव घाटूळ, श्रीमती रुकसाना मुल्ला, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती गीतांजली शिंदे, श्रीमती विद्या खेडेकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभाग नोंदवला.
याशिवाय सामाजिक बांधिलकी जपत उद्योजक संदेश चिले, ॲडव्होकेट राकेश साळुंखे, अंगणवाडी सेविका तसेच दोन्ही गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
“पाणी हेच जीवन” हा संदेश दिला प्रत्यक्षात:
स्थानिक पातळीवर श्रमदानातून उभारण्यात आलेले हे वनराई बंधारे वाहून जाणारे पाणी अडवून विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ करण्यास मदत करतील. शासकीय विभाग आणि जनतेच्या सक्रिय सहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित झाले असून, मंडणगड तालुक्यात या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
‘पाणी आडवा, पाणी जिरवा’: मौजे पाट व भिंगळोली येथे श्रमदानातून १२ वनराई बंधाऱ्यांची उभारणीप्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
