मुंबई : जनाब संजय राऊत, रेजिम चेंजच्या गप्पा मारण्यापेक्षा तुम्ही तुमची लेझीम चेंज करा. त्यात तुमचेच अधिक हित आहे. राहुल गांधींच्या तालावर लेझीम खेळायची आणि रेजिम चेंजची भाषा करायची, हे जनतेला कळते. जनता तुमच्या लेझीमच्या तालावर नाचणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी 140 कोटी जनता असल्याने रेजिम चेंजच्या कितीही गप्पा मारल्या तरी तुम्हाला साधा लेझीमचा तालही जमणार नाही, असा घणाघात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. बन पुढे म्हणाले, देशातील सत्ता उलथापालथ करण्याची भाषा करण्यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला उलथेपालथे करत घरी का बसवले, याचे आत्मचिंतन करा. सत्तांतराची आणि अराजकता पसरवण्याच्या तुमच्या भाषेला महाराष्ट्रातील आणि देशातील जनता योग्यवेळी योग्य उत्तर देईल. बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेप्रमाणे भारतात सत्ताबदल करण्याचे तुमचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. विधानसभा निवडणुकीत आणि महापालिका निवडणुकीत जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवली आहेच.
निवडणुका जर गैरमार्गाने जिंकल्या जात असतील तर केरळमध्ये काँग्रेसने निवडणूक कोणत्या गैरमार्गाने जिंकली, हे राहुल गांधींनी एकदा सांगितले पाहिजे. कर्नाटकात काँग्रेसने जिंकलेली निवडणूक कोणत्या गैरमार्गाने झाली, हिमाचल प्रदेशात तुमचे सरकार स्थापन झाले तेव्हा कोणत्या गैरमार्गाने निवडणूक जिंकली, हेही देशाला सांगितले पाहिजे. केरळ, कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि झारखंड या राज्यांमध्ये तुमची सत्ता आली, की तिथे निवडणूक आयोग चांगले. मात्र, बिहार, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात भाजपा जिंकली की तुम्हाला सत्तांतर करावेसे वाटते. कर्नाटकमध्ये सत्तांतर करण्यासाठी आंदोलन झाले तर संजय राऊत त्याचे स्वागत करणार आहेत का? झारखंडमध्ये विद्यार्थ्यांनी पेपरफुटीविरोधात आंदोलन केले तेव्हा हेच राहुल गांधी आणि संजय राऊत गप्प का बसले होते? सत्तापालट करण्याची स्वप्ने फक्त ठरावीक राज्यांमध्येच का पाहिली जात आहेत?, असे सवाल श्री. बन यांनी उपस्थित केले.
भगतसिंग आणि राजगुरू हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले होते. संजय राऊत, तुम्ही बांगलादेश आणि नेपाळची भाषा करत आहात. देशात अराजकता पसरवण्यासाठी भगतसिंग आणि राजगुरूंनी लढा दिला नव्हता. तुम्ही दुर्दैवाने भगतसिंग आणि राजगुरू यांची तुलना अभिजीत दीपके यांच्याशी करत आहात. तुमच्या मालकांनी याच अभिजीत दीपके यांची तुलना विष्णूच्या अवताराशी केली होती. तिरंग्याच्या नावाखाली या देशात बांगलादेशसारखी जाळपोळ, नेपाळसारखा हिंसाचार आणि श्रीलंकेसारखी अराजकता निर्माण करायची असेल, तर तुमच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होतात. भाजपा तिरंग्याचा अभिमान व स्वाभिमान जपतो. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात आले. काँग्रेसचे सरकार असताना सर्वसामान्य नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा फडकवता येत नव्हता. फक्त शासकीय कार्यालयांपुरता तो मर्यादित होता. आज प्रत्येक नागरिक आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकवू शकतो. तिरंगा फडकवण्याला काँग्रेसने विरोध केला होता, हा तुमचा इतिहास आहे, अशी आठवण श्री. बन यांनी करून दिली.

सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली तरी राऊतांना शहाणपण आलेले नाही

सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली तरी संजय राऊतांच्या ‘रेजिम चेंज’च्या गप्पा सुरूच आहेत. न्यायालयापुढे माफी, बाहेर पुन्हा आक्रमक भाषा करताहेत. संविधानाचा जयघोष करता, मग न्यायालयीन प्रक्रियेचा आदर कुठे होतो हे संजय राऊतांनी सांगावे. माफी मागण्याची वेळ आली; आता जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्या, असा टोलाही श्री. बन यांनी लगावला.