बीड : मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एक दिवसाची नाही तर त्यासाठी अनुभवी… अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची आपल्याला आवश्यकता आहे. सतीश चव्हाण यांनी गेली १८ वर्षे मराठवाडयाच्या प्रश्नासाठी काम केलेले आहे… मराठवाडयाचा आवाज विधीमंडळात पोचण्यासाठी त्यांच्या पाठीशी महायुतीची शक्ती उभी करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीड येथे जाहीर सभेत केले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ बीड येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची जाहीर सभा पार पडली.

आदरणीय दादा बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर जो विश्वास… जो आधार दिलात तोच विश्वास… तेच प्रेम हे जपण्याची जबाबदारी आता माझ्यावर आलेली आहे असे सांगतानाच आदरणीय दादांनी बीडच्या विकासासाठी जी कामे सुरू केली होती… जी बीडसाठी दादांनी स्वप्न पाहिली होती… बीडसाठी दादांनी अनेक शब्द दिले होते… ती स्वप्न पूर्ण करणे ते शब्द पूर्ण करणे ही आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

बीड – पुणे रेल्वे सुरू करण्याचा शब्द आदरणीय दादांनी दिला होता त्यांच्या पश्चात आपण तो पूर्ण करु शकलो याचा आनंद… अभिमान आहे. आदरणीय दादांच्या स्वप्नांना सातत्यात उतरवण्यासाठी बळ वाढले पाहिजे. त्यासाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील आपले महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना आपल्याला मोठया मताधिक्याने विजयी करायचे आहे असे आवाहनही सुनेत्रा पवार यांनी केले.

सतीश चव्हाण यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे. आदरणीय दादांनी सतीश चव्हाण यांना २००८ मध्ये विश्वास ठेवून पहिल्यांदा उमेदवारी दिली. त्यानंतर सलग तीन टर्म मराठवाड्यातील पदवीधरांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. या अठरा वर्षाच्या कालावधीत त्यांनी पदवीधरांच्यासोबत प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, युवक, युवती, महिला, कष्टकरी, कामगार अशा समाजातील विविध घटकांतील प्रश्न विधानपरिषदेत सातत्याने मांडले. गेल्या सहा वर्षांतील त्यांची कामगिरी पाहिली तर त्यांच्या कामाची व्याप्ती आपल्या लक्षात येते. गेल्या सहा वर्षांत त्यांनी ६७७ तारांकित प्रश्न, ९७ लक्षवेधी, अर्धा तासाच्या चर्चेत ५५ वेळा सहभाग, नियम २६० च्या प्रस्तावामध्ये २२ वेळा सहभाग आणि १०७ अशा विविध उल्लेखनीय संसदीय आयुधांचा वापर करुन मराठवाड्यातील प्रश्न विधीमंडळात जोरदारपणे मांडले आहेत. लोकांचे प्रश्न समजून घेणे आणि ते योग्य पद्धतीने मांडणे आणि त्याचा पाठपुरावा करणे व त्या प्रश्नाला न्याय मिळेपर्यंत प्रयत्न करणे हे लोकप्रतिनिधींचे काम सतीश चव्हाण यांनी प्रामाणिकपणे केले आहे हेही आवर्जून सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ हा आपल्या आठही जिल्हयांना जोडणारा मतदारसंघ आहे. मराठवाड्याच्या मातीने संघर्ष पाहिला आहे… अनेक संकटे झेलली आहेत… पण प्रत्येक संकटावर मात करण्याची जिद्दही याच मातीने आपल्याला दिली आहे. याच भागाच्या सर्वांगिण विकासासाठी दर्जेदार शिक्षण, कौशल्य विकास, उद्योग आणि रोजगाराच्या संधीही आपल्याला निर्माण करायच्या आहेत. रेल्वेचा विस्तार आणि सी ट्रीपल आयटी सारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून भक्कम पायाभरणी करणार आहोत असेही सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.

आज आदरणीय अजितदादांची प्रकर्षाने आठवण होत आहे. मराठवाडयाचा पाणी प्रश्न असो… की विकासाचा अनुशेष असो… किंवा तरुणांच्या भवितव्याचा प्रश्न असो… दादांनी नेहमीच कामाला सर्वोच्च प्राधान्य दिले होते हे सर्वांना माहित आहे. त्यांची तीच कार्यपद्धती आणि विकासाची दृष्टी घेवून आपल्याला पुढे जायचे आहे. आणि त्यासाठी विधानपरिषदेत मराठवाड्याचे प्रश्न ताकदीने मांडणारा अनुभवी प्रतिनिधी आपल्याला हवा आहे. आणि म्हणूनच सतीश चव्हाण यांच्या रुपाने तो आपल्याला मिळाला आहे. त्यामुळे या निवडणुकीतसुध्दा सतीश चव्हाण यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन मोठया मताधिक्याने विजयी करायचे आहे असे आवाहनही सुनेत्रा पवार यांनी केले.

आज महाराष्ट्रासमोर दुष्काळाचे मोठे संकट उभे आहे हे आपल्याला माहीत आहे. गेल्याच महिन्यात बीड जिल्ह्यातील काही भागांचा दौरा केला त्यावेळी अतिशय बिकट व भयावह परिस्थिती पहायला मिळाली. अनेक प्रश्न आणि अडचणी आहेत. त्या सगळ्या समजून घेतल्या आहेत. आणि आजच बीडच्या दुष्काळाचा आढावा घेतला. या संकटाच्या काळात शेतकरी आणि सामान्य माणसाला आम्ही एकटं पडू देणार नाही असा विश्वासही सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी दिला.

या जाहीर सभेला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण, माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार विजयसिंह पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित, आमदार मनोज कायंदे, माजी आमदार संजय दौंड, माजी आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार जयंत जाधव, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.