फणसू : मौजे गावातळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दारूबंदीचा ठराव बहुमताने मंजूर होऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थ आणि विशेषतः महिला वर्गातुन प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. गावातील सर्व अनधिकृत दारू धंदे कायमस्वरूपी बंद करावेत तसेच गावात नवीन दारू विक्री परवान्याला परवानगी देऊ नये, अशी तीव्र मागणी गावतळे ग्रामस्थांनी केली आहे.मात्र यावर कारवाईला प्रशासनाकडून वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्याचे पाहायला मिळत आहे.
गावातळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच एन.वाय. पवार व सामाजिक कार्यकर्ते उत्तम पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामसभेत एकमुखाने दारूबंदीचा ठराव ११ ऑगस्ट २०२६ रोजी सरपंच सौ. विधी विनोद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत उपस्थित महिला आणि ग्रामस्थांनी एकमताने गावातील सर्व देशी-विदेशी,गावठी दारूचे अनधिकृत धंदे कायमचे बंद करण्याचा ठराव पारित केला. तसेच भविष्यात गावात कोणत्याही नवीन दारू विक्री लायसन्सला परवानगी देऊ नये, असे ग्रामसभेच्या ठरावाद्वारे ठरविण्यात आले.मात्र
प्रशासनाने या कारवाईकडे सपसेल दुर्लक्ष केले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामसभेच्या या दारूबंदी ठरावाची अंमलबजावणी होण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग (रत्नागिरी), जिल्हाधिकारी कार्यालय (रत्नागिरी), पोलीस अधीक्षक, तहसीलदार दापोली व पोलीस निरीक्षक दापोली यांना निवेदने देण्यात आली होती. परंतु,वरिष्ठ कार्यालयांकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
याबाबत दापोली पोलीस निरीक्षकांनी तत्काळ कारवाई करतो असे आश्वासन दिले होते, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही.उलट
गावात आजही राजरोसपणे अवैध दारू विक्री सुरू असल्याचे ग्रामस्थ्यांचे म्हणणे आहे.
देशी विदेशी दारू विकण्याचा कोणताही परवाना नसताना दारूवाले हा व्यवसाय कसा करू शकतात? याला कोणाचे अभय आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.तसेच गावतळे येथे जवळच जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक हायस्कूल आहे त्यामुळे या अनधिकृत दारू धंद्यांचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ शकतो.त्यामुळे हे धंदे त्वरित बंद करावेत नाहीतर आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा ही ग्रामस्थांनी दिला आहे.
