चिपळूण : मिरजोळी येथील नॅशनल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी पुस्तक प्रकाशन व गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रख्यात कर्करोगतज्ज्ञ डॉ. वसीम फोपलूनकर व शकूर तिसेकर यांच्या लेखनातून साकारलेल्या ‘Breast Cancer – Your Questions, Our Answers’ या पुस्तकाच्या प्रकाशनासह अन्य पुस्तकांच्या मराठी व उर्दू अनुवादांचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
या पुस्तकाचा मराठी अनुवाद श्री. रफिक दलवाई यांच्या लेखणीतून साकारला आहे. कर्करोगाचे रुग्ण तसेच मराठी वाचकांसाठी हे पुस्तक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे. कोकणचे सुपुत्र असलेल्या डॉ. वसीम फोपलूनकर, शकूर तिसेकर व रफिक दलवाई यांच्या साहित्यिक कार्याचा गौरवही या सोहळ्यात करण्यात येणार आहे. स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करणे हा या पुस्तक प्रकाशनामागील प्रमुख उद्देश आहे.
याच कार्यक्रमात मिरजोळी येथील आलिया अहमद दलवाई यांनी लिहिलेल्या ‘Ready, Set, Interview’ आणि ‘The Graduate Transition’ या दोन पुस्तकांचाही विशेष उल्लेख करण्यात येणार आहे. उदयोन्मुख तरुणांना मुलाखतींची तयारी करण्यासाठी तसेच व्यावसायिक जीवनात प्रवेश करताना योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने ही पुस्तके लिहिण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांसह तरुण वाचकांसाठी ही पुस्तके उपयुक्त ठरणार आहेत.
मिरजोळी येथील दलवाई परिवारातील लेखकांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नामवंत सर्जन डॉ. रत्नाकर घाणेकर उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार भास्करशेठ जाधव, आमदार शेखर निकम, डॉ. अद्वैत गोरे, रमेशराव कदम, सदानंद चव्हाण आणि चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ उपस्थित राहणार आहेत.
तसेच डॉ. इसहाक खतिब, डॉ. प्रा. रुपाली दांडेकर, डॉ. श्रुतिका कोतकुंडे, डॉ. अब्बास जबले, डॉ. शरिफा मुकादम आणि डॉ. फैसल दलवाई यांचीही या कार्यक्रमाला सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाचा तपशील :
दिनांक : रविवार, २५ ऑक्टोबर २०२६
वेळ : सायंकाळी ४.३० वाजता
स्थळ : नॅशनल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मिरजोळी, ता. चिपळूण
या पुस्तक प्रकाशन व गौरव सोहळ्यास साहित्यप्रेमी, वाचक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक दलवाई जमाअत परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
