चिपळूण : तालुक्यातील टेरव येथे लोकवस्तीत उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवरविरोधात ग्रामस्थ महिलांनी सुरू केलेले साखळी उपोषण गुरुवारी स्थगित करण्यात आले. कंपनीकडून आवश्यक कागदपत्रे सादर होईपर्यंत टॉवरला वीजजोडणी देऊ नये, अशी मागणी करणारे पत्र ग्रामपंचायतीकडून महावितरणला दिले जाणार आहे. तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाने टॉवर आणि रस्त्यादरम्यानच्या अंतराची प्रत्यक्ष मोजणी केल्याने महिलांनी तूर्तास उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
टेरव येथे मोबाईल टॉवर उभारण्याच्या निर्णयाला ग्रामस्थांनी ग्रामसभेत तीव्र विरोध दर्शविला होता. मात्र, ग्रामस्थांचा विरोध डावलून कंपनीने टॉवर उभारल्याचा आरोप करण्यात आला होता. लोकवस्तीत मोबाईल टॉवर नको, अशी ठाम भूमिका घेत ग्रामस्थ महिलांनी १६ ऑक्टोबरपासून ग्रामपंचायतीसमोर साखळी उपोषण सुरू केले होते.
मोबाईल टॉवरची आवश्यकता मान्य असली, तरी तो लोकवस्तीपासून दूर उभारण्यात यावा, अशी मागणी महिलांनी केली होती. यासाठी ग्रामस्थ मोफत जागा उपलब्ध करून देण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
या प्रश्नावर बुधवारी संबंधित अधिकारी, कंपनीचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्यात चर्चा झाली. मात्र, या चर्चेतून कोणताही ठोस तोडगा निघाला नसल्याने महिलांनी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, गुरुवारी कंपनीने आवश्यक कागदपत्रे सादर करेपर्यंत टॉवरला वीजजोडणी देऊ नये, यासाठी महावितरणला पत्र देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. त्याचबरोबर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने टॉवर आणि रस्त्यादरम्यानच्या अंतराची प्रत्यक्ष मोजणी केली.
या प्रशासकीय कार्यवाहीमुळे प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने पुढील कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त करत ग्रामस्थ महिलांनी साखळी उपोषण तूर्तास स्थगित केले. टॉवरच्या प्रश्नावर प्रशासनाकडून पुढे कोणती भूमिका घेतली जाते, याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.