खेड : ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, मोरवंडे-बोरज येथील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. सतरा वर्षांखालील मुलांच्या संघाने उपविजेतेपद मिळवत प्रशालेच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
या स्पर्धेत ज्ञानदीपच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक समन्वय, चपळता, जिद्द आणि खेळातील कौशल्याच्या जोरावर प्रभावी कामगिरी केली. संघातील पार्थ कांबळे, रुद्र चव्हाण, सम्यक गमरे, अवधूत लाड आणि विघ्नेश डांगे यांनी आपल्या खेळाच्या जोरावर प्रशालेचा नावलौकिक वाढवला. या खेळाडूंना क्रीडाशिक्षक आशिष देशमाने सर आणि हर्षदा पार्टे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे प्रशालेत आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या मेहनतीचे आणि सांघिक भावनेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढ्ढा, विश्वस्त पेराज जोयसर व भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे, सल्लागार मंडळाचे सदस्य, प्रशालेचे प्राचार्य भरत मोरे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच आगामी स्पर्धांमध्येही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्यासाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत ज्ञानदीप स्कूलचे यश…!
