चिपळूण : शहरातील बाजारपेठेतील रस्त्यांवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात चिपळूण नगर पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने बुधवारी (२९ ऑक्टोबर) दुपारी कारवाई केली. जुना स्टॅण्ड ते गांधी चौकदरम्यान रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या दहा ते पंधरा विक्रेत्यांवर कारवाई करत त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाई दरम्यान पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची झाल्याचे प्रकार घडले.
चिपळूण शहरातील बाजारपेठ परिसरात काही विक्रेत्यांनी रस्त्यावर स्टॅण्ड, छत्र्या तसेच विविध वस्तू मांडून व्यवसाय सुरू केला होता. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वारंवार वाहतूक कोंडी होत होती. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली.
बुधवारी दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची झाल्याचा प्रकारही समोर आला. मात्र, या प्रकारानंतरही पथकाने कारवाई सुरू ठेवत रस्त्यावरील अतिक्रमण हटविले आणि विक्रेत्यांचे साहित्य जप्त केले.
दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील वाहतूक सुरळीत राहावी आणि रस्ते अतिक्रमणमुक्त व्हावेत, या उद्देशाने करण्यात आलेल्या या कारवाईमुळे बाजारपेठेतील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. यापुढेही अशा प्रकारच्या अतिक्रमणांवर नगरपालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
