चिपळूण : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब), चिपळूण जिल्हा शाखा रत्नागिरी संचालित नॅब आय हॉस्पिटल, चिपळूण येथील ‘बाह्यरुग्ण तपासणी कक्षाचा’ उद्घाटन समारंभ रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी आमदार शेखरजी निकम यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
चिपळूण येथील परशुराम नगर परिसरातील इब्राहिम आर्केड, मुंबई-गोवा महामार्गावरील हॉटेल शालोम शेजारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये चिपळूण नगराध्यक्ष उमेश सकपाळ तसेच सिंधुरत्न समृद्ध योजनाचे उपाध्यक्ष डॉ. विनय नातू यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान आमदार शेखरजी निकम यांनी नॅब संस्थेचे अध्यक्ष निलेश भुरण, कार्यवाह भरत नांदगावकर, खजिनदार नयन साडविलकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पुष्कराज नारखेडे तसेच संपूर्ण कार्यकारिणीचे विशेष कौतुक केले.
नॅब आय हॉस्पिटलच्या माध्यमातून चिपळूण व परिसरातील नागरिकांना नेत्रतपासणी आणि आरोग्यविषयक चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. विशेषतः अंध व्यक्ती, दृष्टिदोष असलेले नागरिक तसेच गरजू रुग्णांसाठी संस्था सातत्याने करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. समाजातील गरजू घटकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळावा, या उद्देशाने संस्थेने सुरू ठेवलेले काम निश्चितच महत्त्वपूर्ण असल्याचे आमदार निकम यांनी नमूद केले.
आरोग्यसेवा ही समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. विशेषतः डोळ्यांच्या आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, वेळेवर तपासणी करणे आणि आवश्यक उपचार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. नॅब संस्थेने या दिशेने सुरू केलेला उपक्रम समाजासाठी उपयुक्त ठरत आहे. संस्थेचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी सेवाभावी वृत्तीने काम करीत असून, त्यांच्या कार्यातून सामाजिक बांधिलकी जपली जात असल्याचे गौरवोद्गार आमदार शेखरजी निकम यांनी काढले.
नवीन बाह्यरुग्ण तपासणी कक्षामुळे रुग्णांना नेत्रतपासणीसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. भविष्यातही संस्थेने आपल्या सेवाकार्याचा विस्तार करून जास्तीत जास्त गरजू रुग्णांपर्यंत पोहोचावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी नॅब संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देत रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा, आरोग्यविषयक उपक्रम आणि भविष्यातील नियोजनाबाबत उपस्थितांना माहिती दिली.
नॅब संस्थेच्या माध्यमातून आरोग्यसेवेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य सुरू असून, नव्या तपासणी कक्षामुळे चिपळूण तालुक्यासह परिसरातील नागरिकांना निश्चितच फायदा होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याला नॅब संस्थेचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
नॅब संस्थेच्या या सेवाभावी उपक्रमामुळे चिपळूणच्या आरोग्यसेवा क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध झाली आहे.
यावेळी माजी आमदार विनय नातू, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, मिलिंद कापडी, सुचय रेडीज, निलेश भुरण, भरत गांगण, डॉक्टर मिलिंद गोखले, नयन साडविलकर, सूर्यभान साळुंखे, बाबू तांबे, समीर जाणवलकर, भरत नांदगावकर, सतीश वीरकर, अदिती देशपांडे, राधिका पाथरे, दादा खातू, विजय सावंत, सोनाली खर्च, ऋषी थरवळ, ओंकार रेडीज आदी मान्यवर उपस्थित होते.
