रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा तालुक्यातील अंजणारी घाट आणि अंजणारी पूल परिसर प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनत असल्याचे गेल्या दोन महिन्यांतील अपघातांच्या मालिकेवरून स्पष्ट होत आहे. अंजणारी ते वाकेड दरम्यान अवघ्या दोन महिन्यांत तब्बल १२ अपघात झाले असल्याचे वृत्त असून त्यामध्ये जीवितहानीसह वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काल रात्री अंजणारी पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात कर्तव्य बजावताना मदतीसाठी निघालेले महामार्ग वाहतूक मदत केंद्र, हातखंबा येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष आप्पासाहेब गायकवाड यांचेसह ट्रकड्रायव्हर व क्लिनर अशा तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलीस कॉन्स्टेबल अनिल शिंगाडे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना अत्यंत वेदनादायी असून पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो.
मात्र, या दुर्घटनांकडे केवळ वाहनचालकांची चूक किंवा निष्काळजीपणा म्हणून पाहून प्रशासनाला आपली जबाबदारी झटकता येणार नाही. अंजणारी घाटातील तीव्र वळणे, उतार, अवजड वाहनांची वाहतूक, रस्त्याची भौमितिक रचना, दिशादर्शक फलक, संरक्षक कठडे आणि अपघात प्रतिबंधक उपाययोजना यांचीही तितक्याच गांभीर्याने तपासणी होणे आवश्यक आहे. अपघातानंतर चालकांवर गुन्हे दाखल होतात, मात्र रस्त्याच्या रचनेत किंवा सुरक्षा व्यवस्थेत संभाव्य त्रुटी असतील तर त्याची जबाबदारी कोण घेणार?
विशेष म्हणजे, १३ ऑगस्ट २०२६ रोजीच मी संबंधित विभागाला लेखी निवेदन देऊन अंजणारी घाटातील अपघातप्रवण ठिकाणे, तीव्र वळणे आणि संभाव्य धोक्यांबाबत आवश्यक उपाययोजना सुचविल्या होत्या. अपघात रोखण्यासाठी तातडीने तांत्रिक सर्वेक्षण करून योग्य सुरक्षा उपाययोजना राबविण्याची मागणीही केली होती. मात्र, या सूचनांकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नसल्याचे आजच्या अपघातांच्या मालिकेवरून दिसून येत आहे. वारंवार सूचना देऊनही प्रशासनाने वेळीच कार्यवाही केली असती, तर काही दुर्घटना टाळता आल्या असत्या का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली १४-१५ वर्षे रखडले आहे. या काळात कोकणवासीयांनी धूळ, वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि असंख्य गैरसोयी सहन केल्या. आता काम पूर्ण करण्याच्या घाईत गुणवत्तेच्या आणि रस्ता सुरक्षेच्या निकषांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी आहेत. लांजा उपशेट्येवाडी येथील उड्डाणपुलाच्या भिंतीतून होणारी पाण्याची गळती आणि काँक्रीटच्या घटकांबाबत निर्माण झालेले प्रश्न हेही याच गंभीर परिस्थितीचे निदर्शक आहेत.
अंजणारी-वाकेड दरम्यान वारंवार होणारे अपघात, त्यातून झालेली जीवितहानी आणि वाहनांसह सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान या बाबींची केवळ अपघात म्हणून नोंद करून प्रशासनाला जबाबदारीतून मुक्त होता येणार नाही. १३ ऑगस्ट २०२६ रोजी संभाव्य अपघातप्रवण ठिकाणांबाबत लेखी सूचना देऊनही आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नसतील, तर या प्रशासकीय दुर्लक्षाचीही सखोल चौकशी झाली पाहिजे. अपघातांना कारणीभूत ठरलेल्या रस्त्याच्या संभाव्य त्रुटी, सुरक्षा उपाययोजनांतील कमतरता आणि संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष सिद्ध झाल्यास, या सर्व जीवितहानी व आर्थिक नुकसानीची जबाबदारी संबंधित प्रशासन, कंत्राटदार आणि दोषी अधिकाऱ्यांवर निश्चित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.
माझ्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
१. अंजणारी ते वाकेड दरम्यान गेल्या दोन महिन्यांत झालेल्या १२ अपघातांची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करावी.
२. अंजणारी घाट, अंजणारी पूल आणि तीव्र वळणांच्या परिसराचे तज्ज्ञ अभियंत्यांमार्फत तातडीने रोड सेफ्टी ऑडिट व तांत्रिक सर्वेक्षण करावे.
३. रस्त्याचा उतार, वळणांची रचना, अवजड वाहनांची सुरक्षित वाहतूक, दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर, प्रकाशयोजना, संरक्षक कठडे आणि क्रॅश बॅरिअर्स यांची तपासणी करून आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात.
४. १३ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या निवेदनातील सूचनांवर काय कार्यवाही करण्यात आली, याचा लेखी खुलासा संबंधित विभागाने करावा.
५. महामार्गाच्या कामाचा दर्जा, कंत्राटदाराची जबाबदारी आणि देखरेख करणाऱ्या यंत्रणेच्या कामकाजाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी.
६. लांजा उपशेट्येवाडी उड्डाणपुलासह संपूर्ण महामार्गावरील रत्नागिरी जिल्यातील सर्व उड्डाणपुलांचे स्वतंत्र स्ट्रक्चरल ऑडिट करून दोषांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी.
७. अपघातप्रवण ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना पूर्ण होईपर्यंत आवश्यकतेनुसार तात्पुरते वाहतूक नियंत्रण व वेगमर्यादा लागू करावी.
महामार्गाच्या कामातील संभाव्य त्रुटी, प्रशासनाची निष्क्रियता आणि अपघातांमुळे झालेली जीवितहानी यांची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. ही मागणी कोणत्याही व्यक्ती किंवा यंत्रणेला दोषी ठरविण्यासाठी नसून भविष्यात निष्पाप नागरिकांचे आणि प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी आहे.
अंजणारी-वाकेड या महामार्गावर गेल्या दोन महिन्यात झालेल्या अपघातांची, त्यामध्ये झालेली जीवितहानी, जखमींची संख्या आणि वाहनांसह सार्वजनिक व खासगी मालमत्तेच्या नुकसानीची संपूर्ण अधिकृत आकडेवारी प्रशासनाने तातडीने जाहीर करावी. तसेच, १३ ऑगस्टच्या निवेदनानंतर कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या किंवा का करण्यात आल्या नाहीत, याचाही लेखी खुलासा करावा.
१४-१५ वर्षे हाल सोसलेल्या कोकणवासीयांना आता निकृष्ट रस्ता आणि टोलची शिक्षा नको! उद्घाटनाची घाई करण्यापेक्षा महामार्ग सुरक्षित करण्याला प्राधान्य द्या. अपघात झाल्यानंतर पंचनामे आणि चौकशा करण्यापेक्षा अपघात होऊच नयेत, यासाठी प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत. १३ ऑगस्टच्या निवेदनाकडे झालेले दुर्लक्ष आणि त्यानंतर घडलेल्या दुर्घटनांची जबाबदारी निश्चित होईपर्यंत आम्ही हा प्रश्न सातत्याने लावून धरणार आहोत. कोकणवासीयांना केवळ चौपदरी महामार्ग नको, तर सुरक्षित प्रवासाचा अधिकार हवा!
