चिपळूण :रक्तदान ही केवळ सामाजिक सेवा नसून, एखाद्याला जीवनदान देणारी मानवतेची चळवळ आहे. या उदात्त भावनेतून रत्नागिरी जिल्ह्यात रक्तदात्यांचे संघटन करून रक्तदान चळवळीला व्यापक स्वरूप देणारे ब्लडलाईन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा सुमन विद्यालय, टेरवचे ज्येष्ठ शिक्षक श्री. अमोल शशिकांत टाकळे यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या या सेवाकार्याबद्दल त्यांना ‘नॅशनल अवॉर्ड २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.

शुक्रवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी तासगाव, जिल्हा सांगली येथे आयोजित विशेष पुरस्कार वितरण सोहळ्यात स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी श्री प्रदीप आप्पा कदम तसेच बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडियाचे संस्थापक अध्यक्ष श्री. विक्रम विश्रांत यादव यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडिया यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यास अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष श्री. तुकाराम धायगुडे, अभिजीत कौलगे, गणेश माने, पलूस तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. महेश चौगुले, वैभव यादव, अभिजीत बुधले, आसिफ आत्तार तसेच तासगाव तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. किरण अवचर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

ब्लडलाईन ग्रुपच्या माध्यमातून आज हजारो रक्तदात्यांचे संघटन करण्यात आले असून, रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागांत रक्तदानाची चळवळ सातत्याने राबविली जात आहे. तरुणांना रक्तदानासाठी प्रेरित करणे, सामाजिक संस्था व मंडळांना रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी प्रोत्साहित करणे, शिबिरांचे नियोजन करणे आणि गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधणे, अशा विविध उपक्रमांतून या ग्रुपने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सहज उपलब्ध न होणाऱ्या दुर्मिळ निगेटिव्ह रक्तगटाच्या रक्तदात्यांचेही प्रभावी संघटन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या गरजू रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासल्यास संबंधित रक्तपेढ्यांच्या मागणीनुसार रक्तदात्यांशी तातडीने संपर्क साधून रक्तदानाची व्यवस्था करण्यासाठी ग्रुपचे सदस्य तत्परतेने कार्यरत असतात. त्यामुळे अनेक रुग्णांसाठी ब्लडलाईन ग्रुप आशेचा किरण ठरत आहे.

‘रक्ताचा प्रत्येक थेंब अनमोल असून, योग्य वेळी मिळालेला रक्ताचा एक थेंब एखाद्याला नवे जीवन देऊ शकतो,’ या विचारातून श्री. अमोल टाकळे यांनी रक्तदान चळवळीला सामाजिक बांधिलकीचे स्वरूप दिले आहे. रक्तदान ही केवळ एखाद्या व्यक्तीची किंवा संस्थेची जबाबदारी नसून ती संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश त्यांच्या कार्यातून दिला जात आहे.

या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल भावना व्यक्त करताना श्री. अमोल टाकळे म्हणाले, “मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार माझा एकट्याचा सन्मान नसून रक्तदानाच्या चळवळीत निःस्वार्थपणे सहभागी होणाऱ्या संपूर्ण ब्लडलाईन परिवाराचा सन्मान आहे. या कार्यात योगदान देणारे हजारो रक्तदाते, ग्रुपचे सर्व सहकारी आणि रक्तसेवेसाठी सदैव तत्पर असणारे प्रत्येक हात हे या सन्मानाचे खरे मानकरी आहेत.”

यावेळी त्यांनी कोकणातील रक्तसेवा अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण आवाहन केले. कोकणातील सर्व रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना गरजेच्या वेळी रक्तासाठी धावपळ करावी लागणार नाही. यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक तरुणांनी रक्तदान चळवळीत सहभागी होऊन नियमित रक्तदान करावे आणि इतरांनाही या सेवाकार्यात जोडावे. संघटित रक्तदात्यांची ताकद हीच रक्तसेवेची खरी शक्ती असून, सामूहिक प्रयत्नांतून कोकण रक्तसेवेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिक्षण क्षेत्रातील आपल्या अध्यापन कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासारख्या जीवनदायी चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या श्री. अमोल टाकळे यांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर झालेला गौरव हा टेरव गावासह रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

त्यांच्या या सन्मानाबद्दल शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, कला, क्रीडा आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक व सेवाभावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.