चिपळूण : कळंबस्ते येथे रेल्वे फाटक असल्याने उड्डाणपूल उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून सातत्याने होत आहे. वारंवार होणारे तांत्रिक बिघाड, सतत बंद राहणारे फाटक आणि वाहतुकीची कोंडी यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या मार्गावरून १५ गाव परिसरातील नागरिक तसेच चिपळूण तालुक्यातील सहा गावांतील लोक दररोज प्रवास करतात. मात्र फाटकामुळे वेळेचा अपव्यय, अपघाताचा धोका आणि वाहतुकीचा खोळंबा हा दैनंदिन प्रश्न बनला आहे. “रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र” या घोषणेत कोकणातील महत्त्वाच्या फाटकांचा समावेश नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे कळंबस्ते फाटकासह कोकणातील प्रलंबित प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी होत आहे. रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने मोठे पाऊल जरी जाहीर झाले असले, तरी कोकण भागाला न्याय मिळणे अत्यंत आवश्यक आहे.आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुमित्रा वहिनी पवार यांच्याकडे या प्रश्नाबाबत विनंती करण्यात येणार असल्याचे शौकत मुकादम यांनी सांगितले आहे.
