रायगड : अहिल्यादेवी सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेच्या वतीने तसेच माथाडी कामगार आरसीएफ यांच्या पुढाकारातून वायशे येथे दत्त टेकडी मंदिरात लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य जयंती महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. जयंतीनिमित्त विविध प्रबोधनात्मक, वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

यावेळी रा. जि. प. गटनेत्या मानसीताई दळवी, भाजप भटके-विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजूशेठ साळुंके, ऑल इंडिया धनगर समाज, दिल्लीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, शेषव सातलकर, ॲड. अंकित बंगेरा, पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून करण्यात आली. यानंतर धनगरी संस्कृतीचे दर्शन घडविणारा धनगरी ओवी कार्यक्रम, महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ, प्रमुख पाहुण्यांचा सत्कार तसेच ह.भ.प. ज्ञानेश्वरीताई घाडगे यांच्या प्रभावी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या कीर्तनातून उपस्थितांना अध्यात्म, संस्कार आणि समाजसेवेचा संदेश मिळाला.