चिपळूण : पहिल्याच कॉमनवेल्थ कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. या विजयात चिपळूण तालुक्याचा सुपुत्र शुभम शिंदे याने भारतीय संघाचा सदस्य म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक जिंकणाऱ्या शुभमच्या कामगिरीमुळे चिपळूणसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शुभम शिंदे याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चिपळूणमधील पदाधिकाऱ्यांनी त्याची विशेष भेट घेऊन अभिनंदन केले आणि पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात चिपळूणचे नाव उंचावणाऱ्या या खेळाडूच्या यशाचा अभिमान व्यक्त करत पदाधिकाऱ्यांनी त्याच्या कामगिरीचे कौतुक केले.
चिपळूणच्या मातीतून घडलेल्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदकाच्या विजयात योगदान देणे ही स्थानिक क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे. शुभमची ही कामगिरी केवळ त्याच्या वैयक्तिक मेहनतीचे फलित नसून चिपळूणमधील नवोदित खेळाडूंनाही मोठी प्रेरणा देणारी आहे. त्याच्या यशामुळे स्थानिक स्तरावरील क्रीडा गुणवत्तेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मिळालेली ओळख अधोरेखित झाली आहे.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम गुजर, तालुका संपर्क संघटक अशोकराव नलावडे, शहरप्रमुख सचिन (भैय्या) कदम, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे, युवासेना शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, शहर सचिव प्रशांत मुळ्ये, उपतालुका प्रमुख सचिन शेट्ये, उपशहरप्रमुख मनोज पांचाळ, विभागप्रमुख अजित गुजर आणि शाखाप्रमुख आशिष कदम उपस्थित होते.
शुभम शिंदेच्या सुवर्णयशाने चिपळूणच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढला असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
