रत्नागिरी : सर्वसामान्यांच्या घरात दिवाळीचा आनंद, उत्साह आणि रोषणाई सुरू असताना दुसरीकडे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र सेवा बजावणाऱ्या होमगार्ड जवानांच्या घरात मात्र पगाराअभावी अंधार पसरण्याची वेळ आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल १५० होमगार्ड जवानांचे सप्टेंबर महिन्यापासून रेल्वे बंदोबस्ताचे पेमेंट रखडल्याने यंदाची दिवाळी आर्थिक विवंचनेत साजरी करण्याची वेळ या जवानांवर आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात १२० पुरुष आणि ३० महिला असे एकूण १५० होमगार्ड जवान कर्तव्य बजावत आहेत. पोलीस दलाला सहकार्य करताना हे जवान विविध बंदोबस्तांसह सध्या रेल्वे बंदोबस्ताची जबाबदारीही पार पाडत आहेत. विशेष म्हणजे रेल्वे बंदोबस्तासाठी २४ तास कर्तव्यावर राहूनही त्यांच्या मेहनतीचे मानधन वेळेत मिळत नसल्याचे चित्र आहे. सप्टेंबर महिन्यापासूनचे जीआरपी रेल्वे बंदोबस्ताचे पेमेंट अद्याप अदा करण्यात आलेले नसल्याने जवानांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
एकीकडे सणासुदीचा काळ, घरातील मुलांचे शिक्षण, किराणा, घरखर्च आणि दिवाळीचा फराळ, कपडेलत्ते अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्याची वेळ असताना हातातच पैसे नसल्याने या जवानांची मोठी कोंडी झाली आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या कौटुंबिक अडचणी बाजूला ठेवून कर्तव्य बजावणाऱ्या या जवानांच्या कुटुंबीयांना मात्र दिवाळीचा आनंद अनुभवता येणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नियमानुसार एका होमगार्ड जवानाला दिवसाला १ हजार २८३ रुपये भत्ता मिळतो. त्यानुसार १५० जवानांचे ३० दिवसांचे एकूण मानधन सुमारे ५७ लाख ७३ हजार ५०० रुपये होते. एवढी मोठी रक्कम थकीत असल्याने जवानांना आपल्या हक्काच्या मानधनाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
या गंभीर प्रश्नाची जिल्हा समादेशक अधिकारी तथा अपर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. महामुनी यांनी तातडीने दखल घ्यावी. रखडलेले पेमेंट त्वरित अदा करण्यासाठी संबंधित स्तरावर पाठपुरावा करून होमगार्ड जवानांच्या हातात दिवाळीपूर्वी त्यांचे हक्काचे मानधन मिळवून द्यावे, अशी आर्त मागणी होमगार्ड पथकातील जवानांकडून करण्यात येत आहे.
जनतेच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस पहारा देणाऱ्या होमगार्ड जवानांच्या स्वतःच्या घरातच दिवाळीला अंधार राहणार का? पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या या जवानांची दिवाळी आनंदाची, समृद्धीची आणि भरभराटीची व्हावी, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.
दिवाळीच्या सणात होमगार्डच्या घरात अंधार! तीन महिन्यांचे पेमेंट रखडले; १५० जवान आर्थिक विवंचनेत…
