चिपळूण: परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या दैवदुर्लभ निर्गुण पादुका, पालखी आणि चैतन्यदायी मूर्तीचे येत्या रविवारी २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता मार्कंडी मठात आगमन होत आहे.त्यानंतर सायंकाळी सात वाजल्यापासून वेस मारुती मंदिरासमोरील प्रांगणात भाविकांसाठी दर्शन सोहोळा सुरू होणार आहे.

चिपळूण येथील श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज परिवारातर्फे गेल्या २४ वर्षापासून स्वामींच्या पालखी दर्शन सोहोळ्याचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी हा दर्शन सोहोळा वेस मारुती मंदिरासमोर साजरा होतो. यंदाही २२ आणि २३ फेब्रुवारी असे दोन दिवस स्वामींच्या मूर्ती, पादुका आणि पालखीचे भाविकांना दर्शन घेता येणार आहे. २२ रोजी सायंकाळी साडेचार वाजता पालखीचे मार्कंडी येथील अक्कलकोट स्वामी समर्थ मठात स्वागत होईल. त्यानंतर मठापासून वेस मारुती पर्यंत वाजत गाजत स्वामीनामाचा जयजयकार करीत टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य दिंडी काढण्यात येईल. दिंडीने पालखीचे वेस मारुती प्रांगणात आगमन झाल्यानंतर त्याच ठिकाणी पालखी विराजमान होईल आणि सायंकाळी सात वाजल्यापासून सर्वांना दर्शनाचा लाभ घेता येईल.

२३ फेब्रुवारी रोजी पहाटे स्वामींच्या पादुकांवर दुग्धाभिषेक त्यानंतर नामजप, स्वामी पाठ,भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. संपूर्ण दिवसभर स्वामी भक्तांना मनोभावे दर्शन घेता येणार आहे. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी पुन्हा दुग्धाभिषेक झाल्यानंतर सकाळी आठ वाजता पुढील प्रवासासाठी पालखी रवाना होईल. अशा पद्धतीने यंदाचे पालखी दर्शन सोहोळ्याचे नियोजन आहे असे कळविण्यात आले आहे. हा दर्शन सोहोळा यशस्वी करण्यासाठी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज परिवाराचे सर्व सदस्य अविश्रांत परिश्रम घेत आहेत.