लांजा-: गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या सोळा चाकी ट्रकने पुढे असलेल्या खाजगी लक्झरी बसला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे चालकासहित २६ जण जखमी झाले.. हा अपघात शुक्रवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर आंजणारी पुलाजवळ घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषिकेश अनंत जोशी (वय ३४ राहणार विरार मुंबई) हा आपल्या ताब्यातील लक्झरी बस (क्रमांक एम एच ४८ डी.सी.९४३९) घेऊन विरार ते मालवण असा चालला होता. या लक्झरी बस मधून २७ प्रवासी प्रवास करत होते. ही लक्झरी बस आंजणारी घाटातील उतार उतरत असताना आंजणारी पुलाजवळ आली असता पाठीमागून आलेल्या १६ चाकी ट्रकने (ट्रक क्रमांक आर जे १९ जीजे ४७८६) बसला जोरदार धडक दिली. हा ट्रक चालक दिलावर सुमार खान (वय ३५, राहणार जैसमलेर राजस्थान) हा चालवीत होता.

पहिल्या धडकेनंतर काही क्षणातच या ट्रकची बसला दुसऱ्यांदा जोरदार धडक बसली, ज्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्यावरच पलटी झाली. ट्रकची धडक इतकी भीषण होती की, पलटी झालेली बस महामार्गावर तब्बल २०० मीटरपर्यंत फरफटत गेली. पहाटेच्या सुमारास अचानकपणे घडलेल्या या अपघातानंतर प्रवाशांचा एकच आरडाओरडा सुरू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच हातखंबा आणि लांजा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. अनेक प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी रत्नागिरी एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.

या अपघातातील सर्व जखमींना जिजाऊ संस्था तसेच नरेंद्र महाराज संस्थांनच्या रुग्णवाहिकेने
तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय, पाली आणि लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करण्याचे काम हाती घेतले. सकाळी सात वाजता वाहतूक सुरळीत करण्यात आली.

अपघातानंतर जखमी प्रवाशांना लक्झरी बस मधून बाहेर काढण्यासाठी तसेच रुग्णालयात पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अग्निशमन केंद्र रत्नागिरी उप अग्निशमन अधिकारी व्ही.के.राणे, एच व्ही आखाडे, एस. बी. पाटील, व्ही.के.गोसावी, एस एस पष्टे, सी.आर.ठाकूर, एस.एन.सांगळे, पी. एस. धायतडक, ए एम पवार, पी. पी इंगळे, लांजा पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक
देवकन्या मैदाड, हेड कॉन्स्टेबल विलास जाधव, नासिर नावळेकर, श्री.राणे, हातखंबा वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी, जिजाऊ संस्थेचे योगेश पांचाळ व सहकारी, आधार सोशल फाउंडेशन लांजा संस्थेचे अध्यक्ष राजू जाधव आणि सहकारी यांनी मेहनत घेतली.

या अपघात प्रकरणी ट्रकचालक दिलावर सुमार खान (वय ३६) याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२५(अ), १२५(ब), २८१ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अमित यादव राजापूर पोलीस ठाणे, प्रभारी चार्ज) त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास जाधव हे करत आहेत.

अपघातामध्ये जखमी झालेले प्रवासी नयन दीपक कुलकर (वय १० वर्षे, राह. मुंबई विरार) प्रकाश थकटू धावडे (वय ५४ राहणार वारगाव कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग), ऋतवी अभिषेक पारकर (वय १० वर्षे, राह. मुंबई ), प्रांजली मंगेश राऊत (वय ९ वर्ष राह मुंबई ), यशवी अभिषेक पारकर (वय ५ वर्षे मुंबई ), सुधा महेश सावंत (वय २८ वर्षे देवगड वळवंडे), अश्विनी जयवंत वालम(वय २० वर्षे राहणार मुंबई ), आराध्या अभिषेक पारकर( वय ३८ राहणार मुंबई ), दिलवर खान (वय ३६ राहणार मुंबई, विश्वास लक्ष्मण राऊत (वय ५५ राहणार मुंबई), विनिता विश्वास राऊत (वय ५२ मुंबई ), सूर्यकांत शंकर जाडवी (वय ३१ मुंबई ), लक्झरी बस चालक ऋषिकेश अनंत जोशी (वय २३, राहणार विरार मकर पाडा) दुसरा चालक कुणाल प्रकाश कांबळे (वय २६ राहणार विरार ईस्ट), ट्रक क्लीनर सुभानखान दिने खान (वय २२ राहणार जैसमलेर राजस्थान) असे जखमी झाले.

वरीलपैकी विश्वास लक्ष्मण राऊत, सूर्यकांत शंकर साळवी, विनिता विश्वास राऊत आणि ट्रक चालक दिलावर सुमार खान यांना गंभीर दुखापती झाल्याने त्यांना अधिक उपचार साठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.