मुंबई – दिवाळीनंतर थंडीची चाहूल अधिक तीव्र होऊ लागली आहे. राज्यातील अनेक भागांत रात्री आणि पहाटे गारवा जाणवत असून, दिवसा मात्र उष्ण आणि कोरडे वातावरण अनुभवायला मिळत आहे. कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतारांमुळे राज्यात सध्या संमिश्र हवामान पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २० नोव्हेंबर रोजी राज्यातील बहुतांश भागांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील हवामान कसे असेल, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. या भागात कमाल तापमान 32 अंश, तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात काहीशी वाढ झाल्याने दिवसा उष्णता जाणवू शकते. दुसरीकडे, रात्रीच्या वेळी हवेत गारवा कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील 2 ते 3 दिवस तापमानात चढ-उतार होऊ शकतात. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत पहाटेच्या वेळी थंडी जाणवत आहे. काही ठिकाणी किमान तापमान 12 अंश सेल्सिअसपर्यंत घसरत असल्याने सकाळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना गारव्याचा सामना करावा लागत आहे. या भागात कमाल तापमान 31 ते 32 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. सध्या कोणताही हवामान अलर्ट नसला, तरी तापमानातील फरकामुळे दिवसा उष्णता आणि पहाटे थंडी असे वातावरण अनुभवायला मिळत आहे.
पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत हवामानात मोठ्या बदलाची शक्यता नाही. या भागात कमाल तापमान 27 अंश, तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. रात्री आणि पहाटे गारवा जाणवू शकतो. आगामी दिवसांत किमान तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता असल्याने थंडीच्या तीव्रतेत चढ-उतार दिसू शकतात. मराठवाड्यातील बहुतांश भागांत कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण दिसू शकते. या विभागात कमाल तापमान 31 अंश, तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. तापमानात काही प्रमाणात चढ-उतार होऊ शकतात; मात्र सध्या पावसासाठी अनुकूल परिस्थिती दिसत नाही.