मुंबई : आपला गणेशोत्सव हा वैश्विक अद्वितीय मुल्य असलेला उत्सव असून त्यामुळेच त्याला राज्य महोत्सवाचा दर्जा शासनाने दिला आहे. आता यापुढील काळात विविध आकडेवारीचे संकलन व विश्लेषण करुन या उत्सवाची अभ्यासपुर्ण नियोजनबध्द मांडणी जगासमोर करुन पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक चळवळीची 100 वर्षाहून अधिक परंपरा असलेला या उत्सवाचे वैश्विक अद्वितीय मुल्य जगासमोर आणू या, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज येथे केले
गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर उत्सवाचे हे दुसरे वर्षे असून, महाराष्ट्रासह जगभर साजरा होणाऱ्या गणेशोत्सवामध्ये सुसूत्रता यावी व नियोजनबद्ध उत्सव साजरा व्हावा या दृष्टीने आज राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी याबाबत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे दोन वेगवेगळ्या बैठका घेतल्या. एक बैठक सांस्कृतिक कार्य विभाग व सर्व जिल्हाधिकारी व राज्याचे पोलीस, वाहतूक व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन उत्सव आयोजनाबाबत महत्त्वाच्या सूचना केल्या. तर दुसरी बैठक गणेशोत्सव समन्वय महासंघ, समन्वय समिती, मुर्तीकार संघ यांच्यासह महापालिका, पोलीस, एसटी महामंडळ, रेल्वे, पोलीस तसेच सांस्कृतिक कार्य विभाग यांची संयुक्त बैठक मंत्री शेलार यांनी घेऊन गणेशोत्सवाबाबत येणाऱ्या अडचणी, समजून घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.