मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आम्ही यापूर्वीच व्यक्त केली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून, दुष्काळग्रस्तांना मदत देण्याऐवजी सरकार राजकीय विषयांमध्ये व्यस्त आहे,असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले की, सरकारने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची दिवाळी भेट अद्याप अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी कर्जवसुली थांबवण्याचे आदेश देऊनही बँका आणि फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या जात आहेत. सरकारच्या आदेशांची अंमलबजावणी होत नसेल तर संबंधित कंपन्यांवर कारवाई का होत नाही,असे शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले.
शशिकांत शिंदे म्हणाले की,मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे, केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला तातडीची आर्थिक मदत मिळवून देण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. सरकारकडे निधी उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचत नसेल तर ही दुर्दैवी बाब आहे. डीपीडीसीसह सरकारचा संपूर्ण निधी आवश्यकतेनुसार वळवून केवळ तातडीच्या कामांनाच प्राधान्य देण्याची गरज आहे.रायगड जिल्ह्यातील माड, मुरूड आणि अलिबाग परिसरातील दौऱ्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली आहे,पहिल्या पेरणीनंतर अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेली, तर दुबार पेरणीची संधीही अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही,काही ठिकाणी दुबार पेरणीनंतरही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त म्हणून विचार करून मदत द्यावी,असेही शशिकांत शिंदे यांनी बोलताना स्पष्टपणे सांगितले आहे.
शशिकांत शिंदे म्हणाले की,मुंबई, ठाणे, परिसरातील वाढत्या शहरीकरणामुळे भविष्यात पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण होऊ शकते,उपलब्ध पाण्याचे नियोजन न करता बांधकामांना मंजुरी देणे चुकीचे आहे. पाणीवाटपात प्रथम पिण्याचे पाणी, त्यानंतर शेती आणि शेवटी उद्योगांना प्राधान्य दिले पाहिजे. पाणीवाटपाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देऊन जिल्हास्तरावर नियोजन करण्याची आवश्यकता आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे पाणीवाटपाचे नियोजन विस्कळीत होत आहे, असे शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की,एसआरए योजनेतील कथित घोटाळा आणि टीडीआर गैरव्यवहारावरही होत आहेत, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये बनावट किंवा अस्तित्वात नसलेल्या सभासदांची नावे दाखवून टीडीआर मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय आहे. झोपडपट्टीधारकांची संख्या आणि प्रत्यक्ष झोपड्यांची संख्या यामध्ये तफावत असल्याने ७० टक्के संमती नेमकी कोणाकडून आणि कशा पद्धतीने घेण्यात आली, याची सखोल चौकशी झाली पाहिजे,मुंबई, ठाणे, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कथित टीडीआर घोटाळ्यांचीही चौकशी करून दोषींवर कारवाई करावी,एकीकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारकडे पैसे नसल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे सरकारी तिजोरीचे नुकसान करणारे कथित घोटाळे समोर येत आहेत,असेही शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले.
