मंडणगड : मंडणगड शहरातील पाणीप्रश्नावरून राजकीय स्तरावर श्रेयवादाचे वातावरण असले तरीही जलसंकटावर मात करण्यासाठी शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, व्यापारी, तरुण मंडळे आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र आल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळाले.

शहराच्या पाणीप्रश्नाला राजकारणापेक्षा अधिक महत्त्व देत नागरिकांनी प्रत्यक्ष श्रमदानातून जलस्रोत संवर्धनाचा अभिनव उपक्रम राबविला.शनिवार २१, रविवार २२ आणि सोमवार दि. २३ नोव्हेंबर असे सलग तीन दिवस गांधी चौक परिसरातील नाले, पाण्याचे प्रवाह आणि जलस्रोतांमध्ये साचलेला गाळ काढण्याचे काम करण्यात आले. तीन जेसीबी आणि दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात गाळ उपसून जलप्रवाह मोकळे करण्यात आले. विशेषतः गांधी चौक परिसरातील नाले तसेच स्मशानभूमी परिसरातील जलस्रोतांमधील गाळ हटविण्यावर भर देण्यात आला या उपक्रमामुळे पावसाचे पाणी अडवून साठविण्यास मदत होणार असून परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांच्या भूजल पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पावसाळ्यानंतर पाण्याची उपलब्धता कमी होत असताना स्थानिक जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. या दृष्टीने करण्यात आलेला हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.शहराच्या पाणीप्रश्नावर राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या स्तरावर दावे-प्रतिदावे आणि श्रेयवाद सुरू असला, तरी प्रत्यक्ष शहराच्या समस्येच्या वेळी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र काम करण्याची तयारी नागरिकांनी दाखविली आहे. शहराच्या विकासासाठी केवळ राजकीय व्यासपीठावर श्रेयाची स्पर्धा करण्यापेक्षा नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर एकत्र येऊन प्रत्यक्ष कृती करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे.राजकीय मतभेद असू शकतात; मात्र शहराच्या पाणीप्रश्नासारख्या मूलभूत समस्येच्या वेळी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची वृत्तीच मंडणगडच्या विकासाला दिशा देणारी ठरेल, असा संदेश या सामूहिक श्रमदानातून मिळाला आहे.