खेड : भारतीय जनता पार्टीचे खेड तालुका अध्यक्ष विनोद चाळके यांचा वाढदिवस यंदा कोणत्याही औपचारिकता किंवा दिखाव्याविना पूर्णपणे सामाजिक बांधिलकी जपत अत्यंत उत्साहात आणि विधायक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर, माजी सैनिकांसोबत दिवाळी फराळाचा स्नेहमेळावा आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणचा उपक्रम राबवून त्यांनी समाजाप्रती कृतज्ञता आणि सामाजिक एकतेचा अनोखा संदेश दिला.
सध्या परिसरातील तीव्र पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थितीची गरज ओळखून, विनोद चाळके यांच्या नेतृत्वाखाली धामणंद पायरवाडी येथे जॅकवेलच्या बाजूला एका नवीन बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली. या जनहिताच्या उपक्रमामुळे परिसरात पाणी साठवणूक व जलसंधारणाला मोठी मदत होणार असून, ग्रामस्थांसाठी हा अत्यंत दिलासादायक ठरला आहे.
रक्तदान शिबिर आणि माजी सैनिकांचा सन्मान
चाळके यांच्या वाढदिवसा निमित्त बाई रतनाबाई घरडा हॉस्पिटल, खेड येथे आयोजित रक्तदान शिबिराला भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘रक्तदान हे श्रेष्ठदान’ असून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले. याचदरम्यान आजी- माजी सैनिकांसोबत दिवाळी फराळाचा कार्यक्रम पार पडला. सैनिकांशी संवाद साधत त्यांच्या देशसेवेप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच, यावेळी काही माजी सैनिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला. आमदार प्रमोद जठार यांनी त्यांचे पक्षात स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला
आमदार जठार यांनी खेड तालुका भाजपा अध्यक्ष विनोद चाळके यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याचे भरभरून कौतुक केले. आगामी काळातही त्यांच्या हातून अशीच समाजोपयोगी आणि विकासात्मक कार्ये घडत राहो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमांना रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा महामंत्री वसंत ताम्हणकर, भाजपा ज्येष्ठ मार्गदर्शक राजूभाई रेड्डीज, गुहागर पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे, तालुका सरचिटणीस संदेश म्हापदी, तालुका उपाध्यक्ष संकेत हुमणे, महिला मोर्चा अध्यक्ष श्रीमती प्रीतम उतेकर, माजी सरपंच जयराम उतेकर, मेजर तालुका उपाध्यक्ष विजय जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
