खेड : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांचीही चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर रामदास कदम यांनी जोरदार पलटवार केला आहे. ‘मनोज जरांगे घाबरले आहेत, म्हणूनच माझ्याकडे बोट दाखवत आहेत,’ अशा शब्दांत कदम यांनी जरांगे यांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘तुमची पत्रकार परिषद होण्याआधीच बीडमध्ये ही ऑडिओ क्लिप वाजली होती. ती माझ्याकडे दुसऱ्या दिवशी आली, तेव्हा मी त्यावर बोललो,’ असेही कदम यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटी रुपयांचे कथित आरोप करण्यात आले असून, मुख्यमंत्र्यांनी आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्व सत्य बाहेर येईल, असा विश्वास रामदास कदम यांनी व्यक्त केला. ‘माझ्याकडे खूप काही मसाला आहे; मात्र सध्या मला काही बोलायचे नाही. चौकशीत जे काही आहे, ते निष्पन्न होईल,’ असे सूचक विधान करत रामदास कदम यांनी या प्रकरणातील सस्पेन्स आणखी वाढवला आहे. आता रामदास कदम यांच्या या पलटवारावर मनोज जरांगे पाटील काय उत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
