मुंबई: राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आयोजित मुंबई पुस्तक महोत्सव 2026 च्या तिसऱ्या दिवशी आकर्षक संवाद आणि वैचारिक सत्रे झाली. वाचनाची परिवर्तनकारी ताकद, भविष्य घडवण्यातील तरुणांची भूमिका, समकालीन राजनैतिक चातुर्याचा संवाद आणि अंतराळ संशोधनातील भारताच्या वाढत्या कामगिरीचा या सत्रांमध्ये वेध घेण्यात आला.
लेखक मंचावर दिल्लीचे माननीय उपराज्यपाल श्री. तरनजीत सिंह संधू यांनी “राजनैतिक चातुर्याचा संवाद” या सत्रात मौलिक विचार मांडले. आंतरराष्ट्रीय संबंधांच्या बदलत्या स्वरूपावर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, पारंपरिकरीत्या शासना मध्ये बंद दाराआड चालणारी मुत्सद्देगिरी आता सार्वजनिक चर्चा, माध्यमे, शिक्षणक्षेत्र आणि नागरी समाज यांच्या प्रभावाखाली अधिकाधिक येत आहे. आज परराष्ट्र धोरण केवळ देशांमध्ये झालेल्या करारांनीच नव्हे, तर देश जगासमोर जी कथने मांडतात त्यांही आकाराला येतात असे त्यांनी नमूद केले. सार्वजनिक संवाद आणि खासगी वाटाघाटी यांच्यात समतोल राखण्याचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले, “खरे आव्हान दोहोंपैकी एकाची निवड करणे हे नाही. जनतेशी केव्हा बोलायचे आणि समोरच्या पक्षाशी केव्हा बोलायचे, हे ओळखणे हे खरे आव्हान आहे.” मुत्सद्देगिरी, जनमत आणि जागतिक घडामोडी यांच्यातील बदलत्या नात्याबद्दल या सत्रातून मौल्यवान ज्ञान मिळाले.
“युवा शक्ती घडवणार भविष्याची दिशा” या आणखी एका रंगतदार संवादात वक्ते ऋषभ शाह होते .राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारताचे संचालक श्री. युवराज मलिक यांनी त्यांच्याशी संवाद साधला; श्री. मलिक यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले. जाणकार, आत्मविश्वासू आणि बौद्धिकदृष्ट्या जिज्ञासू तरुण मन घडवण्यात वाचनाचे असलेले महत्त्व अधोरेखित करताना ऋषभ शाह यांनी तरुणांना छोट्या डिजिटल मजकुराच्या पलीकडे पाहण्याचे आणि अर्थपूर्ण वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “एक रील पाहून तुम्ही ‘कूल’ ठरू शकता, पण पुस्तके प्रत्यक्ष वाचून तुम्ही खऱ्या अर्थाने ‘कूल’ ठरता.” पुस्तकांची निवड कशी करावी, या एका तरुण सहभागीच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी वाचकांना आपापल्या आवडीनिवडी शोधण्यास प्रोत्साहन दिले. ते म्हणाले, “तुम्हाला इतिहास आवडत असेल तर इतिहास वाचा; तुम्हाला काल्पनिक कथा आवडत असेल तर ते वाचा.” चिकाटी, आत्मप्रेरणा आणि सतत शिकत राहण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले आणि तरुणांनी ज्ञानी बनण्याचा प्रयत्न करावा आणि राष्ट्राच्या उभारणीत अर्थपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन केले.
तरुण प्रेक्षकांसाठी एक मोठे आकर्षण ठरले ते प्रेरणादायी सत्र “भेटा! आपल्या सुपर हिरोला”, ज्यात ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला (अशोक चक्र), भारतीय हवाई दलाचे टेस्ट पायलट आणि इस्रोचे अंतराळवीर सहभागी झाले. आपल्या अंतराळ मोहिमेचे आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील (आयएसएस) वास्तव्याचे प्रत्यक्ष अनुभव सांगताना त्यांनी प्रेक्षकांना अंतराळवीरांचे प्रशिक्षण, रॉकेट प्रक्षेपण, सूक्ष्म गुरुत्वाकर्षण, अंतराळातील शारीरिक आणि मानसिक अनुकूलन, वैज्ञानिक प्रयोग आणि पृथ्वीवरील परतीचा प्रवास यांच्या आकर्षक वास्तवाची सफर घडवली. मोहिमेदरम्यान त्यांनी केलेल्या सात भारतीय वैज्ञानिक प्रयोगांबद्दलही ते बोलले आणि अंतराळातून दिसणाऱ्या भारताची झलकही त्यांनी सर्वांसमोर मांडली.
प्रश्नोत्तरांच्या संवादी सत्रात विद्यार्थी आणि तरुण वाचकांनी भारतीय हवाई दलापासून अंतराळवीर होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास, कठोर प्रशिक्षण प्रक्रिया, अंतराळातील जीवन, व्हॉयेजर 1, अंतराळ प्रदूषण आणि अंतराळ क्षेत्रातील तरुणांसाठीच्या संधी याबद्दल उत्साहाने प्रश्न विचारले. भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ कार्यक्रमावर प्रकाश टाकताना त्यांनी गगनयान मोहीम, प्रस्तावित भारतीय अंतराळ स्थानक आणि 2040 पर्यंत चंद्रावर उतरण्याचे भारताचे स्वप्न याबद्दल सांगितले. विद्यार्थ्यांनी आपली स्वप्ने जिद्दीने पूर्ण करावीत, असे प्रोत्साहन देताना त्यांनी शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक कणखरता, शिस्त आणि सातत्यपूर्ण तयारी यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या संवादाने तरुण मनांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र आणि अंतराळ संशोधन या क्षेत्रांत करिअर करण्याची प्रेरणा दिली.
या सर्व सत्रांतून मुंबई पुस्तक महोत्सव 2026 ची वैविध्यपूर्ण बौद्धिक आणि साहित्यिक भावना प्रतिबिंबित झाली; वाचकांना मान्यवर व्यक्तिनां प्रत्यक्ष भेटता आले आणि ज्ञान, नेतृत्व, जागतिक घडामोडी आणि वैज्ञानिक प्रगती यांबद्दल अर्थपूर्ण वैचारिक दृष्टिकोन मिळाला. वाचन संस्कृती जोपासणे, जिज्ञासेला प्रोत्साहन देणे आणि पुस्तके, विचार व संवाद यांच्या माध्यमातून नव्या पिढीला सक्षम करणे हा महोत्सवाचा व्यापक संदेश तिसऱ्या दिवशी अधिक ठळकपणे अधोरेखित झाला.
मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे आयोजन राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे महाराष्ट्र शासन, बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.
महोत्सवात प्रवेश विनामूल्य आहे. पुस्तकप्रेमी, विद्यार्थी, कुटुंबे आणि अभ्यागतांना पुस्तके, साहित्य आणि विचारांच्या या उत्सवात सहभागी होण्याचे आमंत्रण आहे.
