मुंबई :मालाड-मार्वे रोडवरील स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन येथे झालेल्या भीषण बस अपघातात जखमी झालेल्या २१ वर्षीय वैभव गुप्ता यांच्यावर कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय (शताब्दी रुग्णालय) येथे योग्य उपचार करण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. उपचार करण्याऐवजी त्यांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला आणि त्यांच्या उपचारांमध्ये हेळसांड करण्यात आली, असा आरोप भाजप नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे केला. या गंभीर प्रकाराबाबत त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांच्या अनास्थेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवत प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले.
मालाड-मार्वे रोडवरील स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन येथे झालेल्या भीषण बस अपघातात २१ वर्षीय वैभव गुप्ता यांचा एक पाय पूर्णपणे फ्रॅक्चर झाला, तर त्यांच्या संपूर्ण शरीरावर गंभीर जखमा झाल्या. पुढील वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे सरकारी आरोग्य व्यवस्थेच्या कारभाराचा धक्कादायक अनुभव आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सकाळी ११.३० वाजता रुग्णालयात दाखल झालेल्या या जखमी तरुणाच्या नातेवाइकांना दुपारी १२.५० वाजेपर्यंत केसपेपर काढण्यासाठी रांगेत थांबावे लागले. दुपारी २ वाजेपर्यंत त्यांना उपचारांसाठी आत घेण्यात आले; मात्र त्यानंतरही कोणतेही उपचार करण्यात आले नसल्याचा आरोप आहे. इंजेक्शन नाही, क्ष-किरण तपासणी नाही, प्लास्टर नाही; उलट ‘खासगी रुग्णालयात जा’, असे सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
अपघात विभागात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. हिमांशू भामरे यांच्या नेतृत्वाखालील कॅज्युअल्टी विभागाने २१ वर्षीय जखमी तरुणाच्या उपचारांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संपूर्ण शरीरावर जखमा आणि एक पाय फ्रॅक्चर झालेली अवस्था असतानाही सरकारी रुग्णालयाने ‘खासगी रुग्णालयात जा’, असा सल्ला देत जबाबदारी झटकली का? हा आरोग्यसेवेचा कारभार आहे की रुग्णांची थट्टा, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
हीच बाब आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य तेजिंदर सिंग तिवाना यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केली. त्यांनी या गंभीर वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली. स्थायी समिती अध्यक्षांनी हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवत चौकशीनंतर निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.
मात्र, चौकशी होईपर्यंत वैभव गुप्तांसारख्या शेकडो रुग्णांचे आयुष्य याच शासकीय आरोग्य व्यवस्थेच्या बेफिकिरीमुळे धोक्यात येत राहणार का? शताब्दी रुग्णालय हे मुंबईतील गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांसाठी शेवटची आशा असते. तिथे अपघातग्रस्त तरुणालाही ‘खासगी रुग्णालयात जा’, असे सांगितले जात असेल, तर मग या रुग्णालयात डॉक्टर कशासाठी आहेत? असा सवाल तेजिंदर सिंग तिवाना यांनी उपस्थित केला.