दापोली : प्रलंबित वेतन सुधारणा आणि इतर महत्त्वाच्या मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील जिल्हा व तालुका न्यायालयांमधील कर्मचाऱ्यांनी आज मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत स्थानिक न्यायालयीन कर्मचाऱ्यांनीही न्यायालय परिसराबाहेर मंडप उभारून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
“समान काम, समान वेतन!” असा नारा देत कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच जिल्हा व दुय्यम न्यायालयांमधील लिपिक, लघुलेखक, बेलिफ, शिपाई आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणी व सेवाविषयक लाभ तात्काळ लागू करण्यात यावेत, अशी या आंदोलनामागची प्रमुख मागणी आहे.
यापूर्वीही कर्मचाऱ्यांनी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात काळ्या फिती लावून निषेध नोंदवला होता, तसेच ५ नोव्हेंबर रोजी एकदिवसीय सामूहिक रजा आंदोलन केले होते. मात्र, या प्रस्तावावर शासनाकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्याने अखेर राज्यव्यापी बेमुदत संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे.
या संपादरम्यान सर्व कर्मचारी न्यायालय परिसराबाहेर एकत्र बसून शांततेच्या मार्गाने आपला निषेध नोंदवत आहेत. कर्मचाऱ्यांच्या या बेमुदत संपाचा थेट परिणाम न्यायालयाच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजावर आणि खटल्यांच्या सुनावणीवर होत आहे. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.