खेड ( चंद्रकांत बनकर ) : तालुक्यात शिमगोत्सवासाठी गावाकडे येणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण अपघात झाल्याची घटना खेड–धामणंद मार्गावरील ऐनवरे येथे पहाटेच्या सुमारास घडली. बोरिवलीहून सापिर्ली गावाकडे येणारी खाजगी आराम बस पलटल्याने या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोन जण गंभीर जखमी आहेत. सर्व जखमींवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे “काळ आला होता पण वेळ नव्हती आली,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली असून ग्रामदैवतांच्या कृपेने मोठा अनर्थ टळल्याची चर्चा परिसरात होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली येथून सापिर्ली व धामणंद परिसरातील भाविक शिमगोत्सव आणि ग्रामदेवतेच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आपल्या गावी येत होते. नेहमीप्रमाणे ही खाजगी आराम बस काल रात्री बोरिवलीहून निघाली होती. पहाटे सुमारे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बस खेड–धामणंद मार्गावरील ऐनवरे येथे पोहोचली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली.
अपघातावेळी बसमध्ये एकूण २८ प्रवासी प्रवास करत होते. बस पलटल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. काही प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते. मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी तसेच त्या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. बसची समोरील काच फोडून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.
जखमींना तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, शिमगोत्सवासाठी गावाकडे येणाऱ्या भाविकांवर संकट कोसळले असले तरी मोठी जीवितहानी टळल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
