रोहे ( हरिशचंद्र महाडिक ) :रोहे तालुक्यातील सुतारवाडी जवळील येरळ गावाच्या परिसरात लागलेल्या वणव्यात ५० एकर शेत जमीन व खुल्या मैदानातील रायवली आंबे, काजू फणस इत्यादी फळांचे हजारो बाजती झाडे व गवत जळून खाक झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी सकाळी ७ वा.च्या सुमारास घडली असून या घटनेमुळे शेतकरी व ग्रामस्थ वर्गात खळबळ उडाली असून या भागात वणवे लावण्याचे प्रकार सतत घडत असल्याने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.वणवे लावण्याचे प्रकार रोखण्यात वन खात्याला यश कधी येणार असा सवाल या भागातील जनतेतून होत आहे.
येरळ परिसरातील कुंडलिका नदी काठी असलेल्या शेत जमिनीत हरिशचंद्र कुर्ले, गोपीनाथ कदम, हरिशचंद्र कदम, बळीराम आयरे, सुरेश मोरे, शिवराम कदम, दयाराम महाडिक, राकेश कुर्ले, दिनेश मोरे, प्रसाद मोरे, माणिकराव मालुसरे, नितीन जाधव, रमेश मोरे,नारायण कदम, राजन आयरे, विनोद महाडिक, बाळकृष्ण आयरे इत्यादी ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या मालकीच्या शेत जमिनीत हजारो विविध प्रकारचे बाजती झाडे आहेत.त्याचप्रमाणे येथील खुल्या मैदानात मुक्या जनावरांसाठी वैरण असलेल्या जागेत अचानक वणवा लागण्याची दुर्देवी घटना घडली या घटनेची माहिती समजताच वनवा विझवण्यासाठी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव ठोकली व आपल्या जीवाची बाजी लावून वनवा अटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
या वनव्यामुळे फळ देणारी हजारो झाडे जळून खाक झाल्याने शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत.
तसेच मैदानातील गुरांच्या वैरणीचा गवत जळून खाक झाल्यामुळे आता गुरांच्या वैरणीचा प्रश्न बळीराजाला भेडसवणार आहे. गेल्या वर्षी अशा प्रकारचा वनवा लागून मोठी हानी झाली होती. या भागात वारंवार वणवे लागत असल्याने वन खात्याबद्दल ग्रामस्थ वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.तसेच वणवे लावून जंगल व वन संपत्ती नष्ट करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे..
