खालापूर ( राकेश खराडे ) : पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते कृष्णा गंगाराम पारंगे व उप सभापती पदावर शिवसेनेचे भाई उर्फ रघुनाथ शिंदे यांची निवड झाल्याने पंचायत समितीवर तब्बल नऊ वर्षांनी महायुतीचा झेंडा फडकला आहे.खालापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी रिस मोहोपाडा येथील कृष्णा गंगाराम पारंगे व उपसभापती पदी रघुनाथ शिंदे यांची निवड होताच सभापती, उपसभापती यांच्यावर कार्यकर्त्यांनी व आमदार महेंद्र थोरवे यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.
दरम्यान बुधवार दि.11 रोजी खालापूर पंचायत समिती कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार अभय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली, यावेळी गटविकास अधिकारी संदीप कराड उपस्थित होते, तर पंचायत समिती चे आठही सदस्य उपस्थित होते.
खालापूर पंचायत समितीवर महायुतीचे संख्याबळ असल्याने ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत होते.सभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाचे कृष्णा पारंगे व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या देवयानी देशमुख यांनी अर्ज दाखल केला होता, तर उप सभापती पदासाठी शिवसेना पक्षाचे भाई उर्फ रघुनाथ शिंदे व शिवसेना उबाठा गटाच्या प्रमिला पाटील यांनी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक चुरशीची होणार असेच वातावरण निर्माण झाले होते.नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत खालापूर पंचायत समितीवर तीन भारतीय जनता पक्ष, दोन शिवसेना, दोन शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि एक अजित पवार असे बलाबल आहे.अखेर हात वर करून मतदान करण्यात आले, सभापती कृष्णा पारंगे यांना पाच मते, तर देवयानी देशमुख यांना तीन मते पडली, तर उपसभापती भाई शिंदे यांना ही पाच तर प्रमिला पाटील यांना तीन मते मिळाली, अध्यक्ष अभय चव्हाण यांनी कृष्णा पारंगे व उप सभापती भाई शिंदे यांना निवडूण आल्याचे जाहीर केले.आमदार महेंद्र थोरवे यांनी पंचायत समिती येथे नवनिर्वाचीत सभापती, उप सभापती, सदस्य यांचे अभिनंदन केले, आणि भविष्यात खालापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पंचायत समिती सक्रीय सहभाग घेईल, असे आवाहन केले.यावेळी भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, युवा तालुका प्रमुख रोहित विचारे, महादेव गडगे, महिला आघाडी प्रमुख रेश्मा आंग्रे, जिल्हा सचिव प्रशांत खांडेकर, ज्ञानेश्वर गायकवाड, माजी सभापती सौ. कांचन पारंगे, तालुका प्रमुख संदेश पाटील, कैलास म्हात्रे,भारतीय जनता पक्षाचे विठ्ठल मोरे, राजू शहासणे, विनोद भोईर, माजी सरपंच राजू मोरे, माजी सरपंच भूषण पारंगे, अप्पा शिंदे, माजी उपसभापती विश्वनाथ पाटील,कृष्णा गंगाराम पारंगे हे सर्वात मोठी ग्राम पंचायत वासांबे मोहोपाडाचे माजी सरपंच होते, राजकारण आणि प्रशासन या दोन्ही चा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते म्हणून त्यांचा उल्लेख होत आहे. एक प्रभावशाली नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तर उप सभापती भाई शिंदे हे रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष होते, खानाव ग्राम पंचायत सरपंच देखील होते, त्यामुळे प्रशासन अतिशय चांगले चालून जन हिताची कामे होतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.गेली पंचवीस वर्षे शिवसेनेची एकहाती सत्ता होती, परंतु शिवसेनेच्या अंतर्गत वादाने २०१७ साली शिवसेना पराभूत झाली. त्या नंतर २०२६ मध्ये महायुती चा झेंडा फडकला आहे.