मुंबई : उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात जावे असे संजय राऊत यांना वाटत असले तरी ते विधिमंडळात जातील का नाही ते काँग्रेस ठरवणार आहे. काँग्रेसने उपकार केले तरच उद्धव ठाकरेंना आमदारकी मिळणार आहे. उबाठा अस्तित्वात येण्याआधी शिवसेना ही भारतीय जनता पार्टीसोबत होती तेव्हा तुम्हाला स्वाभिमान आणि सन्मान होता. परंतु आता तुम्ही स्वाभिमान काँग्रेसकडे गहाण ठेवला आहे. आमदारकीसाठी सोनिया गांधीसमोर जाऊन मुजरा करावा लागणार आहे हे लक्षात ठेवा, अशा शब्दात भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर गुरुवारी सडकून टीका केली.
शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची याचा निकाल जनतेनेच दिला आहे. विधानसभा, जिल्हा परिषद आणि महापालिका या तिन्ही निवडणुकांमध्ये जनतेने खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची आणि खरी राष्ट्रवादी अजितदादा पवार, सुनेत्राताई पवार यांची असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. आता न्यायालयातून निकाल येईल. मात्र संजय राऊत आणि उबाठा गटाचा आता शिवसेना आणि धनुष्यबाणावर हक्क उरलेला नाही. हिंदुत्वाशी गद्दारी केल्यानेच जनतेने तुम्हाला नाकारले आहे, याची आठवण श्री. बन यांनी राऊत यांना करून दिली.
कोण रामशास्त्री आहे आणि कोण कामशास्त्री आहे हे सांगण्याच्या भानगडीत संजय राऊत यांनी पडू नये. कारण संजय राऊत आणि उबाठा गट स्वतः हरामशास्त्री आहे. कामशास्त्रामध्ये तर संजय राऊतांची पीएचडी झाली आहे. अलिबागच्या बंगल्यामध्ये संजय राऊत नेमके काय काय करतात हे लोकांसमोर आले तर संजय राऊतांना तोंड दाखवता येणार नाही. इतरांना तोंड उघडायला लावू नका तुमचे तोंड काळे झाल्याशिवाय राहणार नाही, असे श्री. बन यांनी सुनावले.
श्री. बन म्हणाले की, देवेंद्रजी फडणवीस यांनी काय बोलावे हे सांगण्याच्या भानगडीत राऊतांनी पडू नये. बाळासाहेबांचे विचार सोडून आणि सौदेबाजी करून तुम्ही तुमचा अख्खा पक्ष काँग्रेसला विकला. आपल्याला राज्यसभेची खासदारकी मिळावी यासाठी राहुल गांधीसोबत सौदेबाजी करण्याचे काम संजय राऊत यांनी केले. देवेंद्रजी फडणवीस हे हिंदुत्वादाचे पाईक आहेत. ते तीनवेळा मागच्या दाराने नव्हे तर जनतेच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांना कुणाशी काय कसे बोलायचे हे माहित आहे. परंतु तुम्ही तोंड उघडले की गटारगंगा बाहेर येते. त्याकडे जरा लक्ष द्या.
भोंदूबाबा खरात लोकांना फसवायचा तसे संजूबाबा राऊत हे भविष्यवाणी सांगून लोकांना फसवण्याचे काम करत आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये कोणता पक्ष विलीन होईल, कोण कुठे जाईल हे सांगण्याच्या भानगडीत संजय राऊत यांनी पडू नये कारण उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे आणि त्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेचे स्वतंत्र अस्तित्व आहे. ते जनतेतून निवडून आलेले आहेत, असे श्री. बन यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
