पोलादपूर-रायगड ( शैलेश पालकर ) : महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाला यावर्षी ९९ वर्षे पूर्ण होत असून शताब्दी वर्षात प्रवेश करत आहे. तसेच १९ व २० मार्च १९२७ रोजी गाडीतळ, महाड येथे झालेल्या ऐतिहासिक परिषदेलाही शंभर वर्षांचा टप्पा गाठण्याचा हा प्रारंभ आहे. या ऐतिहासिक स्मृतींना अभिवादन करण्यासाठी “शिवराय ते भीमराय समता मार्च २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाड येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
महाड येथील पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, पेणच्या नंदा म्हात्रे, नागेश जाधव, चंद्रकांत गायकवाड सुबोध मोरे हे उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, स्वाभिमान आणि न्यायाच्या विचारांचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी हा समता मार्च १७ ते २० मार्च २०२६ दरम्यान किल्ले रायगड ते चवदार तळे, महाड असा आयोजित करण्यात येणार आहे. मागील आठ वर्षांपासून सातत्याने हा मार्च आयोजित केला जात असून यावर्षी त्याचे ९ वे वर्ष आहे.
या मार्च अंतर्गत १७ मार्च रोजी पाचाड येथे मुक्काम, १८ मार्च रोजी रायगड दर्शन व समता मार्च प्रारंभ, तसेच सायंकाळी समता इफ्तार आयोजित करण्यात येणार आहे. १९ मार्च रोजी महाडमध्ये समता रॅली आयोजित करण्यात येईल. दुपारी ३ वाजता समता मार्च छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू होऊन क्रांतीस्तंभ -चवदार तळे बाजारपेठ मार्गे भगवानदास बेकरी मागील गाडीतळ येथे पोहोचेल.
याच ऐतिहासिक स्थळी, जिथे १९२७ साली परिषद झाली होती, तेथे सायंकाळी ५ वाजल्यापासून सभा व चळवळीतील गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. २० मार्च रोजी महाड येथे समता सत्याग्रह परिषद व नियोजन बैठक आयोजित केली आहे.
या कार्यक्रमास चवदार तळे सत्याग्रह आणि ऐतिहासिक परिषदेच्या आयोजनातील दलित व दलितेतर सहकाऱ्यांचे वंशज विशेष उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेत महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी, साहित्यिक व माजी आयएएस अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, आणि परिवर्तनवादी लेखिका प्रज्ञा दया पवार हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा संदेश देणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समता मार्च संयोजन समिती, महाड यांच्या वतीने करण्यात आले आहे.