चिपळूण : सध्या चिपळूण शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येसंदर्भात मागील दोन महिन्यांपूर्वी चिपळूणमधील प्राणीप्रेमींनी चिपळूण नगरपालिकेचे नगराध्यक्ष उमेश सपकाळ यांची भेट घेऊन योग्य उपाययोजना व सुलभ पद्धतीने कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी मार्ग सुचवले होते. त्यावेळी त्यांनी सर्व आश्वासने दिली होती; परंतु अद्याप नगरपालिकेने एबीसी सेंटर उभारलेले नाही.
पवन तलावाशेजारी अग्निशमन दलाच्या पार्किंगमध्ये पत्रे लावून तात्पुरते शेड उभारले आहे. त्यातील काही पत्रे फाटलेली आहेत. त्यामुळे कुत्रे पळून जाऊ शकतात आणि मोठी समस्या निर्माण होऊ शकते. तसेच सदर संस्थेला यापूर्वीही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे.
सदर पत्र्याचे शेड व जागा एबीसी सेंटरच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नाही. त्यामुळे कुत्र्यांच्या नसबंदीचे काम रखडले आहे. मागील महिन्यात नसबंदीसाठी येणाऱ्या संस्थेने त्यांचा प्रतिनिधी पाठवून नगरपालिकेला एबीसी सेंटर कसे असावे, तसेच सर्व त्रुटी व अडचणी समजावून सांगितल्या होत्या. तरीही अद्याप नगरपालिकेने त्यावर कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. परिणामी, संबंधित संस्थेने नसबंदी कॅम्पसाठी येण्यास नकार दिला आहे.
एबीसी सेंटर स्वच्छ, हवेशीर आणि पुरेशी जागा असलेले असावे. नर आणि मादी कुत्र्यांसाठी स्वतंत्र कप्पे असावेत. पिल्लांसाठी वेगळी सोय असावी. एक शस्त्रक्रिया कक्ष तसेच कुत्र्यांना शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतर ठेवण्यासाठी वेगवेगळ्या जागा आणि कचरा विल्हेवाट प्रणाली असणे आवश्यक आहे.
वरील सर्व बाबी पूर्ण करणे ही नगरपालिकेची जबाबदारी आहे, असे प्राणीप्रेमी हर्षद पवार (Animal Rights Activist) यांनी सांगितले.
