जळगाव:- महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ७० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. हल्ली १ तारीख आली की मनात धडकी भरते. सरकार कुठल्या बाजूने आम्हा सामान्य जनतेवर सर्जिकल स्ट्राईक करेल सांगता येत नाही असं त्या म्हणाल्या.

याबाबत त्यांनी सोशल मीडियावर सविस्तर असे लिहिले आहे की, आज १ ऑक्टोबरपासून जनतेच्या आर्थिक गोष्टींवर विविध नियम लावून सामान्य जनतेला झटका दिलाच होता पण व्यवसायिक सिलेंडरचे दर ७० रुपयांनी वाढवून ‘बोनस’ झटका दिला आहे. वर्षाच्या सुरुवातीला जे व्यवसायिक सिलेंडर १६८४ रुपयांना मिळायचे ते आता २९५४ रुपयांना मिळत आहे. ९ महिन्यात जवळपास १५०० रुपयांची वाढ झाली आहे. व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले म्हणजे हॉटेल, खानावळ, कँटीनचे जेवण महागले असे सांगत असतानाच याचा थेट फटका सामान्य माणसाच्या खिशाला बसेल पण सामान्य माणसाने नाराज व्हायचे नाही. आपला जीडीपी ७.८ टक्क्यांनी वाढला यातच आनंद व्यक्त करायचा असा चिमटाही सरकारला काढला आहे.