लांजा : सद्धया लांजा शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठाखंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यातील व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसत असून वसुलीचा बडगा उगारणारे महावितरण अधिकारी सेवा देताना तेवढी तत्परता दाखवत नसल्याने ग्राहकांमध्ये महावितरणच्या ढिसाळ कारभाराबाबत प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
गेल्या आठवडाभरापासून लांजा शहरासह ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. दिवस-रात्र कधीही बत्ती गुल होतेय. तालुक्यात खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा फटका छोट्या व्यावसायिकांना बसत आहे. सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने दुग्धजन्य पदार्थ विक्रेते, गोठवलेले खाद्यपदार्थांचे विक्रेते यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याशिवाय इतर व्यावसायिकही हवालदिल झाले आहेत.
वीजपुरवठा सतत खंडित झाल्याने याचा फटका बँक, दवाखाना, प्रशासनाची सुविधा केंद्रे व सेतू सेवा केंद्राला बसत असतो. नेटवर्क सेवा बंद असल्यास सरकारी कामे रखडतात. कागदपत्रे, दाखले घेण्यासाठी आलेले नागरिक व विद्यार्थ्यांना खोळंबून रहावे लागते. तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना दिवसभर ताटकळत रहावे लागते. सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये बिघाड होऊन आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय.
सतत खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे लांजातील हॉटेल व्यवसायिक पुरते हैराण झाले आहेत. हॉटेल व्यवसायात फ्रिज, डीप फ्रीजर, कोल्ड स्टोरेज यावरच अन्नाची सुरक्षितता अवलंबून असते. परंतु वीजपुरवठा सतत खंडीत होत असल्याने दूध, मांस, भाज्या, आईस्क्रीम यांसारख्या वस्तू खराब होत असून परिणामी ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत. याचा थेट परिणाम हॉटेल व्यवसायावर होताना दिसतो.
याशिवाय शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कमी दाबाच्या वीजपुरवठ्याने फ्रीज, टिव्ही, कॉम्प्युटर, लॅपटॉप, पंखा अशा विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये बिघाड होत असून याचा नाहक भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागतोय, यामुळे महावितरण विरोधात नाराजी उमटल्याचे दिसून येते.
एकीकडे मार्च अखेर असल्याने वीजबिल भरणा न केल्यास महावितरणकडून तातडीने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते. मात्र कमी दाबाने होणारा वीजपुरवठा तसेच सातत्याने खंडित होणारा वीजपुवठा आणि त्यातच असह्य उन्हामुळे उकाडा, यामुळे ग्राहक मेटाकुटीस आले असतानाही महावितरणकडून वीजपुरवठ्याबाबात ठोस कार्यवाही केली जात नसल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
▪️थकित बिलांबाबत लगेच दंड, मग सेवा का नाही..?
तक्रारींचे निवेदन देऊन महिना लोटला तरी कार्यवाही केली जात नाही, सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. तसेच जेव्हा वीजबिल थकित असते, तेव्हा अगदी वेळेवर महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी वसुलीसाठी येतात. वीजबिलाची मुदत संपली की दंड आकारला जातो. मग तशी चोख सेवा का देत नाहीत? अशी विचारणा सर्वसामान्य जनतेमधून होत आहे.
▪️महावितरणच्या भोंगळ कारभाराने हैराण झालो आहे…
वीजपुरवठा सतत खंडीत होत असतो आणि खंडीत झाल्यानंतर महावितरण कार्यालयात फोन केल्यास फोन उचलले जात नाहीत. गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्याने इलेक्ट्रीक शेगडीवर काम करायचे म्हंटले तर वीज सारखी खंडीत होते. सारख्या खंडीत होणाऱ्या विजेमुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणे बिघडतात आणि त्यामुळे आर्थिक फटका बसतो. ऐन दुपारी धंद्याच्यावेळी वीजपुरवठा सारखा खंडीत होत असतो. या सगळ्यांमुळे कंटाळा आला असून महावितरणच्या भोंगळ कारभाराने हैराण झालो आहे.
