मुंबई : रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी आणि पक्षाच्या नेत्यांना बदनाम करण्यासाठी पाच कोटी रुपयांचे पॅकेज एका एजन्सीला दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांना पगार देऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर खोटे आरोप करण्यासाठी काही लोकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचे काम करत आहेत, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना केला.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न तुतारी गटाकडून सातत्याने केला जात आहे. तुतारी गटाचे स्वतःच्या पक्षाकडे जितके लक्ष नाही, त्यापेक्षा अधिक लक्ष आमच्या पक्षावर आणि नेत्यांवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट कशी पडेल आणि पक्ष बदनाम कसा होईल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असा आरोपही सुरज चव्हाण यांनी केला.

तुतारी गटाच्या एका प्रवक्त्याने पत्रकार परिषद घेऊन अशी माहिती दिली की, पक्षाच्या घटनेतून काही फ्रंटल वगळण्यात आले आहेत. त्यामध्ये ओबीसी सेल, सामाजिक न्याय सेल किंवा इतर सेल असल्याची अर्धवट माहिती माध्यमांना देण्यात आली. मात्र, आमच्या घटनेत पक्ष स्थापनेपासून फ्रंटलचे पाच विभाग आहेत. फ्रंटलमध्ये फादर बॉडी, महिला काँग्रेस, युवक, विद्यार्थी आणि सेवादल यांचा समावेश आहे. याच मुद्द्यावरून महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम तुतारी गटाने केले आहे.

तसेच, ओबीसी सेल, सामाजिक न्याय सेल, अल्पसंख्याक सेल हे फ्रंटलमधून वगळण्यात आले असल्याचा खोटा बनाव करण्यात आला आहे. प्रत्यक्षात, हे सेल कधीही फ्रंटलमध्ये नव्हते, तर ते स्वतंत्र सेल म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते, असे स्पष्ट करताना सुरज चव्हाण यांनी पक्षाची घटना दाखवली आणि निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्राची प्रत माध्यमांना सादर केली.

माध्यमांना देण्यात आलेली माहिती ही कलम ३० संदर्भातील होती, तर कलम २८ वगळण्यात आले होते. कलम २८.१ मध्ये एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक, किसान यांसह विविध सेलचा समावेश आहे आणि याची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहे. ही माहिती आजची नसून पक्ष स्थापनेपासूनची आहे. मात्र, जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत कशी येईल, पक्षाची बदनामी कशी होईल आणि प्रतिमा कशी मलिन होईल, यासाठी रोहित पवार यांच्या टीमकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

रोहित पवार यांनी आमच्या पक्षावर आणि नेत्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्यांच्या आमदार आणि खासदारांकडे लक्ष द्यावे. मोहोळचे आमदार कोणत्या पक्षाचे कार्यक्रम घेतात, तसेच सोलापूर जिल्ह्यातील आमदार आणि खासदार कोणत्या पक्षाच्या बॅनरखाली काम करतात, याकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही सुरज चव्हाण यांनी दिला.

आमच्या पक्षातील प्रश्न सोडविण्यासाठी आणि पक्षातील कोणी चुकल्यास त्याला शिक्षा करण्यासाठी सुनेत्रा वहिनी सक्षम आहेत. त्यामुळे आमच्या पक्षात लुडबूड करू नये, अशी विनंती करतानाच यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही सुरज चव्हाण यांनी दिला.