मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला घरगुती गॅस आणि व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा आता जीवन-मरणाचा प्रश्न बनला आहे. या गंभीर प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येत्या ६ एप्रिल रोजी राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आज मुंबईतील पत्रकार परिषदेत करण्यात आली.
बुधवारी १ एप्रिल रोजी मुंबईतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी मुंबई महिला प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी, मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे, राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते, आणि युवक मुंबई प्रदेशाध्यक्ष सागर खरात उपस्थित होते.
या आंदोलनांतर्गत प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी (फोकस पॉईंटवर) कार्यकर्ते आणि नागरिक एकत्र येऊन रस्त्यावर चुली मांडणार आहेत. तिथेच अन्न शिजवून ते अन्न आणि निवेदन घेऊन जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांना देण्यात येईल. गॅसअभावी जनतेला पुन्हा एकदा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे, हे या आंदोलनातून सरकारला दाखवून दिले जाणार आहे.
‘हा केवळ मध्यमवर्गीयांचा प्रश्न नाही’
गॅस टंचाईचा फटका केवळ शहरांनाच नाही, तर ग्रामीण भागातील जनतेलाही बसत आहे. आज ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर इंडक्शन कुकर आणि इलेक्ट्रिक प्लेट्स मिळेनाशा झाल्या आहेत. हॉटेल व्यावसायिक आणि केटरर्सचे मोठे नुकसान होत असून, अनेक ठिकाणी गॅसअभावी लग्नसोहळे पुढे ढकलावे लागत आहेत, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
या पत्रकार परिषदेत मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. एकीकडे सर्वसामान्य एससी, एसटी आणि ओबीसी वर्गातील लोकांना २५-२५ दिवस गॅससाठी वेटिंगवर राहावे लागते, तर दुसरीकडे मंत्र्यांच्या वशिल्याने ठराविक धनदांडग्यांच्या घरी गॅस सहज पोहोचवला जातो. भाजपची ही दुहेरी आणि जातीवादी भूमिका आम्ही सहन करणार नाही,” असा इशारा यावेळी देण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे. ६ एप्रिल रोजी होणाऱ्या या आंदोलनात सर्वसामान्य जनता, छोटे व्यावसायिक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
