लांजा : धावत्या रेल्वेतून खाली रेल्वे ट्रॅकवर पडल्याने ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी, २ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावर मठ गांगरकरगाव येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितू कुमार राजेंद्र दास असे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो (हरपूर बोचहा, समस्तीपूर, विद्यापतीनगर, बिहार) येथील रहिवासी आहे. तो रेल्वेमध्ये बसून गोवा ते समस्तीपूर, बिहार असा प्रवास करत होता. ही रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर लांजा तालुक्यातील मठ गांगरकरगाव येथे आली असता, गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रितू कुमार राजेंद्र दास हा धावत्या रेल्वेमधून खाली पडला.

या घटनेत त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे करत आहेत.