चिपळूण : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., चिपळूण या संस्थेला आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२६ अखेर रुपये २० कोटी ६२ लाख ढोबळ नफा झाला असून आवश्यक त्या सर्व तरतुदीनंतर रुपये ९ कोटी २१ लाख निव्वळ नफा झाला असल्याची तसेच संस्थेने रुपये ५०० कोटी एकत्रित व्यवसायाचे लक्ष्य साध्य केल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री प्रभाकर आरेकर यांनी दिली.

संस्थेच्या कोकण विभाग कार्यक्षेत्रात २२ शाखा व २ कलेक्शन सेंटर कार्यरत असून संस्थेने विश्वासार्हता, पारदर्शकता, सुरक्षितता व व्यावसायिकता यानुसार नियोजनबद्ध कामकाज केल्यामुळे तसेच संस्थेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व हितचिंतक यांनी संस्थेवर दाखविलेला विश्वास व निरंतर सहकार्य यामुळेच संस्थेने या आर्थिक वर्षात विक्रमी नफा मिळविला आहे.

दिनांक ३१ मार्च २०२६ अखेर संस्थेच्या एकूण ठेवी रुपये २७५ कोटी २३ लाख झाल्या असून ठेवीमध्ये ५६ कोटी १९ लाखांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे संस्थेचा एकूण कर्जव्यवहार रुपये २२९ कोटी ३७ लाख असून कर्ज व्यवहारामध्ये रुपये ५३ कोटी १९ लाख वाढ झाली आहे. दिनांक ३१ मार्च २०२६ अखेर संस्थेचे वसूल भागभांडवल रुपये १३ कोटी, निधी २३ कोटी १७ लाख, गुंतवणूक रुपये १०८ कोटी ५० लाख तसेच संस्थेचे खेळते भांडवल रुपये ३४८ कोटी ४३ लाख झाले आहे. संस्थेचा एकत्रित व्यवसाय ५०४ कोटी ६० लाख असून त्यामध्ये गतवर्षीपेक्षा रुपये १०९ कोटी ३८ लाख वाढ झालेली आहे.

संस्थेच्या एकूण कर्जव्यवहारामध्ये सोनेतारण व स्थावर तारण कर्जासारख्या सुरक्षित कर्जाचे प्रमाण सर्वाधिक असून योग्य प्रकारे कर्ज वितरण व नियोजनबद्ध वसुली यामुळे संस्थेच्या थकबाकीचे एकूण कर्जाशी प्रमाण केवळ ०.१०% इतके आहे. तसेच संस्थेचा नेट एनपीए शून्य टक्के राखलेला आहे.

संस्थेचा सी.डी. रेशो ६८.२१% असून आवश्यक त्या सर्व निकषांचे संस्थेने काटेकोरपणे पालन केलेले आहे. संस्थेने शाखा विस्ताराचे धोरण स्वीकारले असून चालू आर्थिक वर्षात पाच नवीन शाखा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मा. श्री प्रभाकर आरेकर यांनी दिली.

संस्थेच्या सर्व शाखा नफ्यात असून सर्व शाखांमध्ये बँकिंगच्या बहुतांश सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.