चिपळूण (विशेष प्रतिनिधी): शहरातील काविळतळी भागातून शुभम प्रकाश पवार (२९) आणि सावर्डा बाजारपेठेतून सिद्धेश मारुती शिंगरे (२०) या दोन तरुणांचे वेगवेगळ्या कारणावरून अपहरण करण्यात आल्याची तक्रार चिपळूण आणि सावर्डे पोलिसात करण्यात आली आहे. यामुळे खळबळ माजली असून जनतेत अपहरणाच्या घटनांमुळे भीती निर्माण झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश मार्तंडराव पवार (वय ७०) यांचा मुलगा शुभम आणि आरोपी सौरभ चव्हाण व वैभव साकंडे (दोन्ही राहणार काळज, लोणंद, जि. सातारा) यांच्यात आर्थिक व्यवहारावरून वाद होता. बुधवार, ८ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास आरोपींनी शुभम याला फोन करून राहुल गार्डन इमारतीखाली बोलावून घेतले. त्यावेळी प्रकाश पवार हे देखील आपल्या मुलासोबत खाली आले होते. मात्र, आरोपींनी शुभम याला काही समजण्याच्या आतच जबरदस्तीने चारचाकी गाडीत बसवले आणि तिथून पळवून नेले.
या धक्कादायक प्रकारानंतर पवार यांनी तातडीने पोलिसात धाव घेतली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सौरभ चव्हाण आणि वैभव साकंडे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४०(३) आणि ३(५) अन्व्यये गुन्हा नोंदवला आहे. भरवस्तीत घडलेल्या या अपहरणाच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, चिपळूण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली असून शुभमचा शोध घेतला जात आहे.
सावर्डा बाजारपेठेतून प्रौढाचे अपहरण
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मेघा मारुती शिंगरे (वय ४९, रा. बिडलीनगर, कणकवली) यांचा मुलगा सिद्धेश मारुती शिंगरे ( २० )हा ३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास सावर्डे बाजारपेठेतून जात असताना त्याचा आरोपींच्या गाडीशी अपघात झाला होता. या अपघातात झालेल्या गाडीच्या नुकसानीची भरपाई मिळावी, या मागणीसाठी आरोपी तेजस गायकवाड, शुभम गायकवाड, राजू गायकवाड आणि विनोद टक्के (सर्व रा. मुंबई) यांनी सिद्धेशला जबरदस्तीने आपल्यासोबत नेले. त्याला एका ठिकाणी बंदिस्त करून ठेवत आरोपींनी त्याच्या नातेवाईकांकडे पैशांची मागणी सुरू केली.
सिद्धेशच्या सुटकेसाठी आरोपींनी वेळोवेळी १८ हजार, २५ हजार आणि पुन्हा २५ हजार अशी रक्कम उकळली आहे. मात्र, इतके पैसे देऊनही सिद्धेशला न सोडता आरोपींनी आता उर्वरित १ लाख २५ हजार रुपयांची मागणी केली असून, ‘पैसे द्या आणि मुलाला घेऊन जा’ अशी धमकी दिली आहे. आपला मुलगा परत न आल्याने अखेर मेघा शिंगरे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून सावर्डे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०८(२), १४२, १२६, १२७(३), १४० आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मुंबईतील संशयित आरोपींचा शोध घेतला जात आहे.
