चिपळूण : चिपळूण शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील विधानसभा मतदार यादी भाग क्रमांक ५३, ५४, ५५ आणि ५८ (खेंड, बावशेवाडी, कांगणेवाडी, बाजारपेठ परिसर) येथील मतदारांसाठी एसआयआर मॅपिंगसाठी विशेष कॅम्प आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगरसेवक तथा गटनेते अंकुश आवले व नगरसेविका सौ. नीलम जाधव यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाकडून आगामी काळात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सध्याच्या मतदार यादीतील मतदारांचे सन २००२ च्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमातील अंतिम यादीशी मॅपिंग करण्याची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या मार्फत मतदान केंद्रनिहाय ही प्रक्रिया सुरू आहे.
मात्र अनेक मतदारांच्या बाबतीत सन २००२ च्या मतदार यादीत त्यांचे किंवा त्यांच्या आई-वडील, आजी-आजोबा यांचे नाव कोणत्या मतदारसंघात, कोणत्या यादीच्या भागात आणि कोणत्या अनुक्रमांकावर होते याची अचूक माहिती उपलब्ध होत नसल्यामुळे मॅपिंग करण्यात अडचणी येत आहेत. विशेषतः विवाहानंतर सासरी आलेल्या महिलांनी आपल्या माहेरी असलेल्या आई-वडील, आजी-आजोबा यांच्या नावाची सन २००२ च्या मतदार यादीतील माहिती मिळवून देणे आवश्यक आहे.
यासाठी शनिवार, दि. ११ एप्रिल ते १२ एप्रिल २०२६ रोजी विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला असून संबंधित भागातील सर्व मतदारांनी आवश्यक माहिती व कागदपत्रांसह (मतदान ओळखपत्र, आधार कार्ड) उपस्थित राहून आपले एसआयआर मॅपिंग करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कॅम्पमध्ये खेंड परिसर, वरची व खालची बावशेवाडी, कांगणेवाडी, खेंड पिंपळ गणेश मंदिर परिसर, अमेय प्रॉपर्टीज, महालक्ष्मी रेसिडेन्सी, परकार कॉम्प्लेक्स परिसर, दुर्गाळी परिसर, जुना स्टँड परिसर, खेंड मारुती मंदिर परिसर तसेच मुख्य बाजारपेठेतील खाटीक गल्ली, रंगोबा साबळे रोड, सावंत गल्ली, ओतारी गल्ली आणि बंदर नाका परिसरातील मतदारांचा समावेश आहे.
सदर भागासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून सागर संगम कदम (भाग ५४), तुषार सुनील जाधव (भाग ५३), ऋषीकेश पाथरे (भाग ५५) आणि संकेत मोहिते (भाग ५८) कार्यरत असून नागरिकांनी आवश्यक माहितीसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. तसेच ‘बूथ ऑफिसर’ म्हणून वैभव एकनाथ निवाते व प्रसाद वामन साडविककर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदार यादी अद्ययावत व अचूक करण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची असल्याने संबंधित सर्व मतदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन गटनेते अंकुश आवले आणि नगरसेविका सौ. नीलम जाधव यांनी केले आहे.