रसायनी (राकेश खराडे) : मोहोपाडा आळी-आंबिवली येथे आकर्षक श्री स्वामी समर्थ मठ साकारण्यात आला आहे. या मठातील श्री स्वामी समर्थ प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. गुरुवार, दि. ९ रोजी सकाळी गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदी श्राद्ध; दुपारी अग्नी स्थापना, नवग्रह मंडळ, वास्तूमंडळ व मुख्य देवता मंडळ स्थापना कार्यक्रम झाला. यानंतर दुपारी पाच ते आठ वाजता मोहोपाडा पोलिस चौकी येथून मुख्य बाजारपेठ मार्गे आळी-आंबिवली गावातून श्री स्वामी समर्थ मठापर्यंत नगरप्रदक्षिणा करण्यात आली. या मिरवणुकीत रथात कलश तसेच श्री स्वामी समर्थांची मूर्ती बसविण्यात आली होती. झांझपथक व बॅण्डच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिलांनी डोक्यावर तुळशीवृंदावन घेतल्याचे पाहावयास मिळाले. तर शुक्रवार, दि. १० रोजी सकाळी त्रिपर्यायी हवन, मूर्ती स्थापना, कलश प्राणप्रतिष्ठा, तत्त्वन्यास, कलशारोहण; दुपारी षोडशोपचार पूजा, आरती आदी कार्यक्रम पार पडले. या सोहळ्यात दोन दिवस आळी-आंबिवली, मोहोपाडा, नवीन पोसरी ग्रामस्थांसह श्री स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोहोपाडा आळी-आंबिवली येथे श्री स्वामी समर्थ मठात प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न
