ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील दापूरमाळ आणि वाशाळा परिसरातील आदिवासी मुलींना पाण्यासाठी दररोज अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याच्या गंभीर प्रकाराची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने दखल घेतली आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना ६ जून रोजी सुनावणीसाठी मुंबईत हजर राहण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
शहापूर तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाईमुळे महिलांसह लहान मुलींनाही डोंगर-दऱ्यांमधून धोकादायक मार्गाने पाणी आणण्यासाठी जावे लागत आहे. आयोगाच्या निदर्शनास आलेल्या माहितीनुसार, अनेक मुलींना दररोज सहा ते आठ किलोमीटर अंतर चालत जाऊन पाणी आणावे लागत असून यासाठी दिवसातील चार ते पाच तास खर्च होतात.
आयोगाने संबंधित विभागांकडून पाणीटंचाई दूर करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा सविस्तर अहवाल मागवला असून कायमस्वरूपी उपाययोजनांचा कृती आराखडाही सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सुनावणी ६ जून रोजी मुंबईतील आयोगाच्या कार्यालयात होणार असून अनुपस्थित राहिल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.