रायगड ( धम्मशील सावंत ) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्यावर होत असलेल्या टीकेला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिले आहे. बापावर चौफेर शाब्दिक वार होत असताना, लेक आदितीने पलटवार केला आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर विरोधी पक्षांतील नेत्यांकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना लक्ष्य केले जात आहे. याबाबत आदिती तटकरे यांना विचारणा केली असता त्यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केल्याचा आरोप केला जात आहे. रोहित पवार यांच्याकडून सातत्याने तटकरे यांना लक्ष्य केले जात आहे. समाजमाध्यमांवर यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. या टीकेला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पहिल्यांदाच उत्तर दिले आहे. कोणी कितीही टीका-टिप्पणी केली तरी तटकरे कुटुंब आणि अजितदादांच्या कुटुंबाच्या संबंधात वितुष्ट येणार नाही. आम्ही यापुढील काळातही पवार कुटुंबाच्या पाठिशी ठामपणे उभे राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तटकरे कुटुंबाचे आणि पवार कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. पवार कुटुंबातील प्रत्येकाशी सुरुवातीच्या काळापासून आमचे चांगले संबंध राहिले आहेत. सुरुवातीपासून अतिशय समन्वयाने त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत आलो आहोत. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून अजितदादांचे जवळचे सहकारी म्हणून तटकरे साहेब काम करत आले आहेत. दोघांची घनिष्ठ मैत्री होती. यापुढेही ती कायम राहील. कोणाला पटो अथवा न पटो, आम्ही आदरणीय सुनेत्रा काकींसोबत यापुढील काळात कायम राहणार आहोत. त्यांना पाठबळ देण्याच्या दृष्टीकोनातून जे काही करणे शक्य आहे ते आम्ही करत राहणार आहोत, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. त्या रोहा येथे माध्यमांशी बोलत होत्या. आयटी क्षेत्रामध्ये हिंदू धर्माच्या मुली सुरक्षित नाहीत या प्रश्नावर मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, या प्रकरणाची माझ्याकडे सविस्तर माहिती आलेली नाही. परंतु, जर काही लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा घेतला असेल, तर मला खात्री आहे की नाशिकचे पोलिस प्रशासन याबाबत गांभीर्याने दखल घेतली असेल. महिला व बालविकास विभागाची मंत्री म्हणून आयटी क्षेत्रातील महिलांसोबत काही चुकीचा प्रकार घडला असेल, तर तिथल्या स्थानिक प्रशासनाशी संपर्क करून आणखी कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे मंत्री तटकरे म्हणाल्या.
अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत. यावर आदिती तटकरे यांनी परखड भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, आपल्या मीडियाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन आहे की, अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल करण्याला कुणी प्रोत्साहन देऊ नये. आपल्याकडे जर असे व्हिडिओ आले, तर त्याबद्दलची रीतसर तक्रार स्थानिक पोलिसांकडे द्यावी आणि ते पुढे फॉरवर्ड होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मी सुरुवातीपासूनच या भूमिकेवर ठाम आहे की मूळ मुद्दा हा त्या पीडित महिलांचा आहे, ज्यांच्यावर अत्यंत निंदनीय प्रकार झाला आहे. ज्या पीडितांवर अन्याय झाला त्यांना न्याय मिळण्यासाठी शासन सर्व पद्धतीने प्रयत्न करत आहे. एक महिला अधिकारी त्यासाठी प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमली आहे. याशिवाय, आणखी पीडित महिलांना माहिती द्यायची असेल, तर त्यांनी पुढे यावे. त्यांची ओळख गोपनीय ठेवण्याच्या दृष्टीने पोलिस प्रशासन खबरदारी घेईल. ज्या साइट्स आणि प्लॅटफॉर्मवरून हे व्हिडिओ व्हायरल केले जातात, त्यांच्यावरही पोलिस विभागाकडून कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, असे तटकरे म्हणाल्या.
पालकमंत्री पदाबाबत काय म्हणाल्या आदिती तटकरे…
विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता स्थापन होऊन दीड वर्ष होत आले, तरी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही असल्याने, गेली दीड वर्ष जिल्ह्याचे पालकमंत्रीपद रिक्त ठेवण्यात आले आहे. पालकमंत्री पदाबाबत महायुतीत एकमत होत नसल्याने या संदर्भातील निर्णय होऊ शकलेला नाही. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना आदिती तटकरे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय लवकरच घेतला जाईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या संदर्भातील निर्णय योग्य वेळी घेतील. तोवर निधीच्या बाबतीत रायगड जिल्ह्यावर कुठलाही अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. महायुतीचे सर्व नेते यासाठी प्रयत्नशील आहेत, असेही त्या म्हणाल्या.
