खेड : – तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाला मोठा धक्का बसला असून पक्षातील काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. खेड शहराध्यक्ष प्रणव प्रमोद मापुस्कर तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वराज विक्रांत गांधी यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात जाहीर प्रवेश केला.
नुकत्याच पार पडलेल्या खेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून निवडणूक लढवलेले प्रणव मापुस्कर व स्वराज गांधी हे अनेक वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहिले होते. त्यांच्या सोबत प्रथमेश प्रशांत सुर्वे, राजेश कदम यांचाही भाजपात समावेश झाला. हा प्रवेश सोहळा भाजप नेते तथा माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना पक्षात योग्य मान-सन्मान दिला जाईल, असा विश्वास भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केला. या प्रवेशामुळे खेड तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे लक्ष वेधले जात आहे .