चिपळूण – गेली कित्येक वर्षे चिपळूण एस.टी. स्टँडचे बांधकाम सुरू आहे. ते पूर्ण होण्यास आणखी किती वर्षे लागणार, हे एकदा महामंडळाने जाहीर करावे, म्हणजे काँग्रेस आणि शेतकरी-कष्टकरी संघटनेला आंदोलनाचे वेळापत्रक जाहीर करणे सोयीचे होईल आणि प्रवाशांनाही वेळापत्रकाप्रमाणे सहभागी करून घेता येईल, असे उद्गार अशोकराव जाधव, ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि शेतकरी-कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी काढले आहेत.
चिपळूण एस.टी. स्टँडचे बांधकाम सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे चार ते पाच ठेकेदार-पोटठेकेदार बदलले; पण प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे आणि ठेकेदारांकडून मिळणाऱ्या कमिशनमुळे असमाधानी असलेले प्रशासन ठेकेदाराला काम पूर्ण करू देत नाही, अशी माहिती मिळते. हे खरे असेल तर महामंडळाच्या बांधकाम प्रमुख अभियंत्याला कायम बडतर्फ करावे आणि पावसाळ्यापूर्वी एस.टी. स्टँडचे बांधकाम पूर्ण करून ते प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मा. अशोकराव जाधव यांनी काँग्रेस आणि शेतकरी-कष्टकरी संघटनेच्या वतीने केली आहे.
