खेड : – महाराष्ट्र शासनाच्या दि. १ व २ एप्रिल २०२६ रोजीच्या आदेशानुसार कायम विनाअनुदानित शाळांना स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर मान्यता घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असली, तरी रत्नागिरी जिल्ह्यातील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड संचालित शाळा बंद होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सांगण्यात आले की, श्री. रामचंद्र धोंडशेट पाटणे ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (प्राथमिक विभाग) तसेच कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्यामंदिर (उच्च माध्यमिक विज्ञान व वाणिज्य) या शाळांना अनुक्रमे सन १९९९-२००० व २००३-०४ पासून कायम विनाअनुदान तत्त्वावर शासनाची मान्यता आहे. गेली २७ वर्षे या शाळा अखंडितपणे सुरू आहेत.