मुंबई : रोज उठून उडता तीर अंगावर घ्यायचा ही संजय राऊत यांची सवय आणि धंदा आहे. महिला आरक्षणाबाबत भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे. तुम्ही महिलांचा आणि नारी शक्तीचा अपमान करताहात. या महिलांचा बाण एकदा सुटला तर तुमची पळता भुई थोडी होईल. विधानसभेच्या निवडणुकीत लाडक्या बहिणींनी तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली. तो बाण कसा घुसला, ती कट्यार कशी काळजात घुसली हे एकदा संजय राऊत यांनी पाहून मग लाडक्या बहिणीचा अपमान करावा, असा घणाघात नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत श्री. बन बोलत होते.
देवेंद्र फडणवीस कुठल्या गटात आहेत हे सांगण्याच्या भानगडीत संजय राऊत यांनी पडू नये, असे फटकारत श्री. बन म्हणाले की भाजपाचा एकच गट आहे तो म्हणजे ‘भारतमाता की जय’ म्हणणारा. प्रत्येकजण भाजपा गटात आहे. उबाठा गटात एक म्हणतो पाकिस्तान झिंदाबाद, दुसरा म्हणतो सोनिया गांधी झिंदाबाद, तिसरा म्हणतो राहुल गांधी झिंदाबाद तर चौथा म्हणतो प्रियंका चतुर्वेदी झिंदाबाद. ही गटबाजी उबाठा गटात असल्याने त्यांनी आपल्या गटबाजीकडे लक्ष द्यावे भाजपाकडे पाहू नये.
रोहित पवार यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडत श्री. बन म्हणाले 2023 साली जेव्हा महिला आरक्षण विधेयक आले होते तेव्हा रालोआकडे स्पष्ट बहुमत असल्याने नाईलाजाने तुम्ही पाठिंबा दिलात. त्यावेळेला त्यात अट होती की जेव्हा जनगणना आणि डीलीमिटेशन होईल तेव्हा हे महिला आरक्षण विधेयक लागू होईल.