चिपळूण ( विशेष प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला दुरुस्ती विधेयकावर ओपन डिबेटसाठी दिलेले चॅलेंज आपण स्वीकारले असून मुख्यमंत्र्यांनी केव्हाही, कुठेही आणि कधीही चर्चेसाठी बोलवावे मी त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे,असे प्रतिआव्हान शिवसेना नेते आ.भास्करशेठ जाधव यांनी दिले.
संसदेत नामंजूर झालेल्या महिला दुरुस्ती विधेयकाबाबतचे वास्तव्य पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्यासाठी काल गुरुवारी आ. जाधव यांनी सर्वपक्षीय चर्चेसत्राचे आयोजन केले होते. यावेळी प्रस्तुत प्रतिनिधींने त्यांना मुख्यमंत्र्यांचे आव्हान आपण स्वीकारता का?असा थेट सवाल विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना आ. जाधव यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेले आव्हान आपण स्वीकारत आहोत असे जाहीर केले.माझे आव्हान स्वीकारण्यासाठी माझ्या तोलामोलाचाच नेता हवा ही मुख्यमंत्र्यांनी अट ठेवली असली तरी दुसऱ्याच्या कर्तृत्वाची उंची तुम्ही कशी मोजू शकता? असा सवाल त्यांनी केला.
एका महत्वपूर्ण विषयावरील या चर्चासत्राचे अनेकांनी स्वागत केले . पत्रकारांप्रमाणेच नगरसेवक, नगरसेविका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य,माजी लोकप्रतिनिधी, बँक संचालक, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर आणि महिला भगिनी उपस्थित होत्या.
