लोटे : – लोटे औद्योगिक वसाहती मधील नळाला रासायनिक सांडपाणी प्रकरणातील प्राथमिक आरोग्य केंद्र लोटे येथे उपचारार्थ दाखल झालेले सर्व ग्रामस्थ सुखरूप असून प्रथमोपचार करून त्यांना लगेचच डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोणाचीही प्रकृती गंभीर नाही,असे प्राथमिक आरोग्य केंद्र लोटे च्या विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

नळाला आलेल्या रासायनिक सांडपाण्याचे नमुने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिनांक बावीस रोजीच ताब्यात घेतले होते आणि ते तपासणीसाठी पाठवले आहेत. घडलेल्या घटनेचा रीतसर अहवाल तयार करून वरिष्ठांकडे पाठवला आहे. सांडपाण्याच्या नमुन्यांचा तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई काय करायची हे आमच्या हेड ऑफिस कडून ठरविले जाईल, असे एम पी सी बी च्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान उपचार घेणाऱ्या सर्व ग्रामस्थांना डिस्चार्ज मिळाला असल्यामुळे आणि कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्यामुळे खेड पोलिस ठाण्यात संबंधित कारखान्या विरोधात कोणताही गुन्हा अद्याप दाखल झालेला नाही.

मात्र नळाला आलेल्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठवले गेले आहेत आणि त्याचा रीतसर तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच नागरी वस्तीसाठी पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी स्वतंत्र असावी. त्यावर कोणत्याही कारखान्याचे कनेक्शन नको, अशा अर्थाची मागणी यावेळी ग्रामस्थांनी लावून धरलेली आहे, त्याकडे एमआयडीसीचे अधिकारी कितपत गांभीर्याने पाहतात आणि ती मागणी केव्हा पर्यंत पूर्ण करतात ? याकडेही संपूर्ण पंचक्रोशी चे लक्ष लागून राहिलेले आहे.