दापोली:- तालुक्यातील मांदिवली येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या ५० एकरांवरील बांबू लागवड प्रकल्पाला रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी शुक्रवारी (दि. ३१ जुलै) भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी दापोलीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक उपस्थित होते.

दोन्ही अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत बांबू शेतीचे महत्त्व, शासकीय योजनांचा लाभ आणि शाश्वत शेतीची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना ग्रामसेवक पोपट भोरजे यांनी केली. गावातील शेतकऱ्यांनी बांबूपासून तयार केलेल्या आकर्षक भेटवस्तू देऊन मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर वैदेही रानडे आणि गणेश मंडलिक यांनी शेतकऱ्यांसमवेत प्रत्यक्ष बांबूची लागवड करून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी भावेश कारेकर यांनी मंडणगड व दापोली तालुक्यात २,००० एकरांहून अधिक क्षेत्रावर बांबू लागवड करून त्यावर आधारित उद्योग उभारण्याचा संकल्प व्यक्त केला. बांबू शेतीमुळे हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यास मदत होण्याबरोबरच ग्रामीण भागात शाश्वत उत्पन्न, स्थानिक रोजगार आणि पर्यावरणपूरक विकासाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मयुरेश जालगावकर आणि केतन निंबरे हे सातत्याने शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून लागवडीचा पाठपुरावा करत आहेत. तसेच किसन निंबरे, अरुण भानत, जयेश शिगवण, धोंडू सावंत, नागेश सावंत, दिलीप सावंत, रंजना सावंत, लक्ष्मी केसरकर, वंदना सावंत यांच्यासह गावातील महिला व पुरुष शेतकरी या प्रकल्पात सक्रिय सहभाग घेत आहेत.

मांदिवली गावात टप्प्याटप्प्याने ५०० एकरांवर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात ५० एकर क्षेत्रात ७,५०० बांबूची रोपे लावण्याचे काम वेगाने सुरू आहे.

मार्गदर्शन करताना वैदेही रानडे यांनी शेतकऱ्यांच्या पुढाकाराचे कौतुक करत, बांबू शेती ही पर्यावरण संवर्धनाबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी आणि भविष्यातील शाश्वत विकासाची प्रभावी दिशा ठरू शकते, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी वैदेही रानडे यांच्या हस्ते बांबू लागवड प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यता आदेशांचे शेतकऱ्यांना वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला हर्णे गटाच्या पंचायत समिती सदस्या सौ. तुलसा जाधव यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.

“मांदिवली गावाने शाश्वत शेती, हरित विकास आणि आत्मनिर्भर भविष्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणारे आहे,” असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.